मोदी आणि कोतकरांची केडगावात एकत्र छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 12:53 IST2018-12-07T05:14:31+5:302018-12-07T12:53:00+5:30
नगरच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या केडगाव उपनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर यांची छायाचित्रे सोबत झळकत आहेत.

मोदी आणि कोतकरांची केडगावात एकत्र छायाचित्रे
अहमदनगर : नगरच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या केडगाव उपनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर यांची छायाचित्रे सोबत झळकत आहेत. भाजपने आदेश दिल्यानंतरही कोतकर समर्थकांनी ही छायाचित्रे न हटविल्याने पक्षाची ऐन निवडणुकीत गोची झाली आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी नगरला प्रचाराची सांगता करणार असून याबाबत ते काय भाष्य करणार? याची राजकीय गोटात उत्सुकता आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने केडगाव या उपनगरात खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कोतकर समर्थकांना एका रात्रीत पक्षात प्रवेश देऊन उमेदवाऱ्या दिल्या आहेत. ‘कोतकरांनी भाजपशी कायदेशीर सेटलमेंट केली आहे’ अशी टीका या प्रवेशाबाबत शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केली आहे. ‘नरेंद्र मोदी व खुनाच्या गुन्ह्यातील कोतकर यांची छायाचित्रे सोबत शोभतात का?’ असाही आरोप सेनेने केला आहे. ‘मोदींसोबत कोतकरांचे फोटो लावू नका’, असा आदेश आम्ही पक्ष कार्यकर्त्यांना दिला असल्याची सारवासारव याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी केली. मात्र, त्यानंतरही केडगावात ही दोन्ही छायाचित्रे घरोघर फिरत आहेत. शहरात सोशल मीडियावरही ही छायाचित्रे झळकली आहेत.
त्यामुळेच कोतकर समर्थकांच्या भाजप प्रवेशाचे मुख्यमंत्री काय समर्थन करणार? की याबाबत ‘मौन’ बाळगणार? याची उत्सुकता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरला ३०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, गत अडीच वर्षात निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना व काँग्रेसने केला आहे.