जामखेड तालुक्यात महिला सरपंचांचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:56+5:302021-02-12T04:20:56+5:30
जामखेड : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यंदा प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. सरपंच निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली तर भाजपची पीछेहाट ...

जामखेड तालुक्यात महिला सरपंचांचा टक्का वाढला
जामखेड : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यंदा प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. सरपंच निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली तर भाजपची पीछेहाट झाली. ४७ पैकी ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला सरपंच झाल्या. त्यामुळे सरपंचपदावरील महिलांचा टक्काही या निवडणुकीत वाढला.
अनेक मातब्बरांच्या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीने तालुक्यातील ३५ च्या आसपास ग्रामपंचायत ताब्यात घेऊन वर्चस्व मिळविले.
तालुक्यातील सर्वांत मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. पंचायत समितीच्या उपसभापती व भाजप नेते रवींद्र सुरवसे यांचा पराभव झाला, तर राष्ट्रवादीचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी १७ पैकी १० जागा जिंकून सरपंचपदी नमिता गोपाळघरे व उपसरपंचपदी अश्विनी लोखंडे यांची निवड बिनविरोध केली. बाजार समितीचे संचालक व भाजप नेते सुभाष जायभाय यांची २५ वर्षांची एकहाती सत्ता गेली आहे. तेथे रवींद्र जायभाय यांनी सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.
नान्नज ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे काठावर बहुमत होते. माजी सभापती तुषार पवार, सुनील हजारे, अप्पा मोहळकर, सचिन मलंगनेर या भाजप नेत्यांनी सत्ता राखली आहे. त्यांनी रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचा पराभव करून सरपंच व उपसरपंच निवडणूक जिंकली. अरणगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता गेली. मात्र, सरपंच व उपसरपंच निवडणूक जिंकून अस्तित्व टिकविले. या निवडीबाबत स्थानिक राष्ट्रवादीने नाराजी दर्शवली आहे. पिंपरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष बापूराव ढवळे यांनी हॅट्ट्रिक करून सरपंच, उपसरपंच निवड जिंकली आहे. भाजपच्या इतर ग्रामपंचायती ताब्यातून जात असताना त्यांनी मात्र सत्ता राखून हॅट्ट्रिक साधली. भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी ग्रामपंचायत निवडणूक व सरपंच निवडणूक बिनविरोध केली.
धामणगाव येथे महारुद्र महारनवर यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून भाजपला तारले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांच्या चोंडी गावात आ. रोहित पवार यांनी मैदान गाजविले व एकहाती सत्ता हस्तगत केली. सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध केली. मोहा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली. विद्यमान सरपंच शिवाजी डोंगरे यांनी तेथे पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. बोरले ग्रामपंचायतीमध्ये विखे समर्थक भारत काकडे यांनी पूर्ण बहुमत मिळवून सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध करून सत्ता राखली.
----
ही महत्त्वाची गावे राष्ट्रवादीकडे...
राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील महत्त्वाची असलेली सोनेगाव, जवळके, खुरदैठन, राजेवाडी, तरडगाव, पाटोदा, देवदैठण, झिक्री, पाडळी, मोहा, आघी, पोतेवाडी, जातेगाव, नाहुली या ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता आणली आहे.
फोटो पाच पासपोर्ट