आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:33+5:302021-04-08T04:21:33+5:30

अहमदनगर: कोरोनाबाधितांसाठी पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिले वसूल केली ...

Pay in advance first, then treatment | आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार

अहमदनगर: कोरोनाबाधितांसाठी पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिले वसूल केली जात आहेत. आधी ५० जे ७० हजार रुपये ॲडव्हान्स भरा, मगच उपचार सुरू होतील, असे नातेवाइकांना सांगितले जात आहे. खासगी रुग्णालयांचे हे आकडे सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारे आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाभरातून रुग्ण नगर शहरातील रुग्णालयांत दाखल होत आहेत. महापालिकेने शहरातील ३१ खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयांना प्रथमदर्शनी भागात दरफलक व बेड उपलब्धतेबाबतचा फलक लावणे बंधनकारक आहे. हे फलक रुग्णालयात लावले आहेत किंवा नाही, कुठल्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत. त्यापैकी ऑक्सिजनचे किती, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. असे असतानाही रुग्णालयांकडून दरफलक तर दूरच, पण त्यांच्याकडे किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीदेखील दिली जात नाही. रुग्णांना गरज पडल्यास कुणाकडे संपर्क करायचा, याचीही कोणतीही सोय महापालिकेने केलेली नाही. महापालिकेचा वचक नसल्याने खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा दर आकारत असून, ५० जे ७० हजार रुपये भरून घेतल्याशिवाय रुग्णांवर उपचार सुरू केले जात नाहीत. ग्रामीण भागातील डॉक्टर शहरातील रुग्णालयांत रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवतात. रुग्णाच्या नातेवाइकांना याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. शहरात आल्यानंतर आधी अगाऊ रक्कम भरा, मगच उपचार सुरू केले जातील, असे त्यांना सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे ऐनवेळी धावपळ होते. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.

..

महापालिका म्हणते.. ॲपवर माहिती मागविली

खासगी रुग्णालयांतील बेड, सुविधा, दरफलक यांबाबत माहिती घेण्यासाठी इतर महापालिकांनी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. अहमदनगर महापालिकेकडे याबाबत विचारणा केली असता, रुग्णालयांना ॲपबाबत माहिती देण्यात आली. त्यावर आपल्या रुग्णालयांतील माहिती अपलोड करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

.....

इंशुरन्स नसलेल्यांची धावपळ

ज्या रुग्णांचा आरोग्य विमा नाही, असे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अचानक पैसे भरण्यास सांगितले जाते. आरोग्य विमा नसल्यामुळे त्यांना सर्वच पैशांची व्यवस्था करावी लागते. त्यात ज्यांचा आराेग्य विमा आहे, अशा रुग्णांना तुमची विम्याची मर्यादा संपली आहे. पुढचे पैसे भरावे लागतील, असे सांगितले जात आहे.

...

शासकीय दराला केराची टोपली

खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार करताना ऑक्सिजनसह एका खाटासाठी ४ हजार, आयसीयू खाटेकरिता ५ हजार आणि व्हेंटिलेटर खाटेकरिता ९ हजार रुपये दर आकारणे बंधनकारक आहे, तसेच एका रुग्णाकडून दिवसाला एक पीपीई किटचे ६०० रुपये एवढे दर आकारू शकते; परंतु शहरातील काही खासगी रुग्णालयांत जास्ती दर आकारून लूट केली जात आहे.

..

अवास्तव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर थेट कारवाई करण्यात येईल. कोणत्याही रुग्णालयांना रुग्णांकडून डिपॉझिट घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.

Web Title: Pay in advance first, then treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.