रेमडेसिविर मिळतील, पण ऑक्सिजनबाबत साशंक
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा दोन-तीन दिवसात सुरळीत होईल, असे सांगितले आहे. मात्र ऑक्सिजनबाबत आम्ही साशंक आहोत. देशात तयार होणाऱ्या ऑक्सिजनच्या कितीतरी पट सध्या कोरोना रुग्णांसाठी लागत आहे. जेएसडब्ल्यू कंपनी, मुकेश अंबानी यांनी प्रत्येकी १०० टन ऑक्सिजनची निर्मिती करून देणार आहेत. मात्र त्याची वाहतूक ते रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी कालावधी जाणार आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत आता राज्यस्तरीय धोरण निश्चित केले जात असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी आधीच उठवली असती तर ही वेळ आली नसती, असेही मुश्रीफ म्हणाले. योग्य त्या माणसालाच रेमडेसिविर द्या. त्याचा अतिरिक्त वापर टाळा, असे आवाहन मुश्रीफ यांनी डॉक्टरांना केले आहे.
----------------
होम आयसोलेशन बंद, संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य
कोरोनाची लक्षणे आता बदलली आहेत. आधी खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप अशी लक्षणे होती. आता संडास, पोटात जळजळणे, डोळ्यावर, कानावर, शरीरावर पुरळ येण्यासारखी लक्षणे आहेत. आता रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार नाही. त्याला थेट संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यामुळे समाजात संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तिसऱ्या लाटेची प्रतीक्षा न करता यंत्रणेने आता झोकून काम करायचे आहे.
--------
आमदार निधीचे एक कोटी कोरोनासाठी
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यातून दोन- तीन तालुक्यांमधील हॉस्पिटलची गरज भागते. इथे जम्बो सिलिंडर भरून देण्याची व्यवस्थाही असेल. असे प्रकल्प आता प्रत्येक आमदारांनी स्वत:च्या मतदारसंघात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदारांनी चार कोटी पैकी एक कोटी रुपये कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी खर्च करायचे आहेत. प्रत्येक तालुक्यात आमदारांनी कोविड केअर सेंटर उभारणे गरजेचे आहे. यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिविर मिळविण्यासाठी हाल होणार नाहीत. जिल्हा नियोजनच्या बजेटमधील ३० टक्के म्हणजे नगर जिल्ह्यात १५ कोटी रुपये कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी खर्च करायचे आहेत, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.