पथदिवे घोटाळा : सातपुते लपला होता नरसोबाच्या वाडीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:40 IST2018-05-25T19:39:31+5:302018-05-25T19:40:09+5:30
महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता.

पथदिवे घोटाळा : सातपुते लपला होता नरसोबाच्या वाडीला
अहमदनगर: महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता. तोफखाना पोलीस ठाण्याचे एक पथक शुक्रवारी सातपुतेला घेऊन नरसोबावाडी येथे गेले आहे. सातपुते नरसोबावाडीत नेमका कुठले लपला होता, तेथे त्याच्या संपर्कात कोण होते आदींबाबत पोलीस माहिती घेणार आहेत.
सातपुते याच्या विरोधात जिल्हा न्यायालयाने स्टॅडिंग वॉरंट काढल्यानंतर तो २० मे रोजी पोलीसांना शरण आला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलीसांच्या चौकशीला सातपुते प्रतिसाद देत नाही. महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याच्या आठरा फाईल सातपुते यानेच गायब केल्याच्या पोलीसांना संशय आहे. सातपुते मात्र ठेकेदार सचिन लोटके याच्याकडे बोट दाखवित आहे. पोलीसांनी मात्र सातपुते विरोधात महत्त्वाचे पुरावे एकत्र केले आहेत. दरम्यान पोलीसांनी महापालिकेत संगनमताने ३४ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा पथदिवे घोटाळा केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात निलंबित लिपिक भरत त्रिंबक काळे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता उर्वरित आरोपी रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके, उपायुक्त विक्रम दराडे व मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे आदींविरोधात लवकरच पुरवणी दोषारोेपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.