पाथर्डी बाजार समितीचे दप्तर सहायक निबंधकांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST2021-01-13T04:52:03+5:302021-01-13T04:52:03+5:30
पाथर्डी : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६२ भूखंड वाटपप्रक्रियेबाबतच्या तक्रारीची जिल्हा उपनिबंधक व प्रांताधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. सकृतदर्शनी ...

पाथर्डी बाजार समितीचे दप्तर सहायक निबंधकांनी घेतले ताब्यात
पाथर्डी : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६२ भूखंड वाटपप्रक्रियेबाबतच्या तक्रारीची जिल्हा उपनिबंधक व प्रांताधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. सकृतदर्शनी भूखंड वाटपाबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सहायक निबंधकांनी बाजार समितीचे सर्व दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी तक्रार दिली होती. बाजार समितीच्या आवारातील भूखंड भाडेतत्त्वावर मिळावेत यासाठी १२ व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या सचिवाकडे अर्ज केले. बाजार समितीने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन मर्जीतील लोकांकडून संस्थेच्या नावाने बँकेत परस्पर पैसे जमा करून घेत काही संचालकांनी भूखंड मिळवण्याचा घाट घातला आहे. संस्थेचे हित लक्षात घेऊन सर्व अर्जदारांना लिलावप्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी दुर्लक्षित केली गेली. जाहिरातीनुसार एकूण २२ अर्जदारांनी अर्ज केले. त्यामध्ये राहाता तालुक्यातीलही अर्जदार आहे. यामध्ये काहींनी पाथर्डी, तीसगाव व खरवंडी येथील बाजार समिती जागेत भूखंड मागितला, तर काहींनी फक्त पाथर्डीमध्ये तशी मागणी केली आहे. तसेच पती-पत्नीने वेगवेगळे भूखंड मागणी केली आहे. असा एकूणच सावळागोंधळ विशिष्ट संचालक व त्यांच्या हितचिंतकांनी घातला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केल्यावर त्याची तत्काळ चौकशी केली. सहायक निबंधक भारती काटुळे यांनी बाजार समितीचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेऊन बाजार समितीच्या सचिवाकडे विविध आक्षेपांर्ह मुद्द्याबाबत खुलासा मागितला आहे. ऐनवेळच्या विषयात भूखंडबाबतचा विषय नियमानुसार घेता येत नाही.
येत्या १३ तारखेला जिल्हा उपनिबंधकांनी सर्व संचालक व सचिव यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. बाजार समितीमध्ये पाथर्डी मुख्य बाजार तळ रिक्त भूखंड १०, मुख्य बाजारतळ व्यापारी गाळे १३, तिसगाव बाजार रिक्त भूखंड २०, रिक्त गाळे नऊ, खरवंडी बाजार रिक्त भूखंड दहा असे एकूण ६२ भूखंड व गाळे लिलावप्रक्रियेत दाखविण्यात आले आहेत. मात्र नियमानुसार दप्तर पूर्ण नाही. भूखंड लिलावप्रकरणी बाजार समितीच्या जिल्हा बँकेच्या शाखेत ४ लाख ९५ हजार रुपये विविध अर्जदारांकडून जमा आहेत. कोणत्याही अर्जाची नोंद आवक-जावक पुस्तकांमध्ये नाही. मात्र अन्यत्र रेकॉर्डला अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत, असे आव्हाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.
----
भूखंड वाटप प्रक्रिया पार पाडायची होती. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने संचालक मंडळाने ही प्रक्रिया रद्द केली आहे.
दिलीप काटे,
सचिव, बाजार समिती, पाथर्डी