रास्ते अलग मगर मंजिल एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:45+5:302021-01-03T04:21:45+5:30
कर्जत : शहरातील विविध सामाजिक संघटनांनी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिवशी सुरू केलेला सामूहिक श्रमदानातून स्वच्छता अभियानाचा ...

रास्ते अलग मगर मंजिल एक
कर्जत : शहरातील विविध सामाजिक संघटनांनी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिवशी सुरू केलेला सामूहिक श्रमदानातून स्वच्छता अभियानाचा उपक्रम आज देखील अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाला कर्जत शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा आदर्श घेऊन कर्जत तालुक्यातील अनेक गावात हे अभियान सुरू झाले आहे. हे अभियान लवकरच शतक पूर्ण करेल.
कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन श्रमदानातून स्वच्छता अभियान सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत एकाही दिवसाची सुट्टी न घेता हे अविरतपणे सुरू आहे. कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आम्ही कर्जतचे सेवेकरी या बॅनरखाली अविरतपणे स्वच्छता अभियान सुरू ठेवले आहे. तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी कर्जत शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी बाभूळ मुक्त कर्जत हे अभियान सुरू केले आहे. पाच जेसीबीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. दररोज कर्जत शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. काम जरी वेगवेगळ्या ठिकाणी होत असले तरी त्यांचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे कर्जत शहराची स्वच्छता. यामुळे याला ‘रास्ते अलग मगर मंजिल एक...’ असे संबोधले तरी वावगे ठरणार नाही.
कर्जत शहरात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छता अभियानामध्ये कर्जत शहरातील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शिक्षक, कर्मचारी, महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सध्या कोरोनाचे संकट असताना देखील नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे अभियान सुरू आहे. कर्जत नगरपंचायतीचे सफाई कामगार दिवसातून दोन वेळा साफसफाई करतात. यामुळे कर्जत शहर स्वच्छ दिसत आहे. सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था परिसर, मंदिर परिसर, बाजारपेठ, रस्ते, याचे रूप पालटले आहे. यामुळे कर्जत नगरपंचायत नक्कीच या स्पर्धेत मोठे यश मिळवेल, असा विश्वास कर्जतकरांना आहे.
...
जनजागृतीसाठी स्वच्छता रथ
कर्जत शहरातील स्वच्छता अभियानाचा आदर्श तालुक्यातील राशीन, सिद्धटेक, कोळवडी, बहिरोबावाडी यांनी घेतला आहे. तेथे स्थानिक ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येऊन हे काम सुरू केले आहे. शेजारच्या श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. कर्जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभय बोरा यांनी दररोज सकाळी श्रमदान करण्यासाठी जे साहित्य लागते. त्याची वाहतूक करणे व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गाडी डिझेल टाकून विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. जनजागृतीसाठी रथ तयार केला आहे.
...
फोटो ०२कर्जत अभियान
...
ओळी- कर्जत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी तयार केलेला रथ.