शिवजयंतीच्या जागेवरून शिंदेसेना आणि आमदार तांबेंचे कार्यकर्ते आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 21:09 IST2025-03-10T21:08:58+5:302025-03-10T21:09:20+5:30
संगमनेरात जागेवरून तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी केली मध्यस्थी.

शिवजयंतीच्या जागेवरून शिंदेसेना आणि आमदार तांबेंचे कार्यकर्ते आमने-सामने
संगमनेर : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी संगमनेर बसस्थानकासमोरील मोकळी जागा मिळावी, याकरिता शिवसेना (शिंदे) आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्यावतीने अर्ज करण्यात आले आहेत. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही जागा मिळावी, याकरिता दोघेही आग्रही आहेत.
तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकाचे समोरील मोकळ्या जागेत शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यासाठी रविवारी (दि. ९) आमदार सत्यजित तांबे यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर तिथे बॅरिकेट्स उभारण्यात आले. ही माहिती समजल्यानंतर शिवसेना (शिंदे) पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे पोहोचले.
त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली. आणि शिंदे सेनेच्या वतीनेही समोरील जागेत बॅरिकेट उभारण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे तेथे पोहोचले, त्यांच्या मध्यस्थीने सध्या तणाव निवळला असून बसस्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.