पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:15 IST2021-08-20T16:14:45+5:302021-08-20T16:15:29+5:30
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदार निलेश लंकेंवर आरोप
अहमदनगरःपारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे, असे या क्लिपमध्ये त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ही क्लिप ज्योती देवरे यांचीच असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन केले आहे. शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली. मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत.
आपल्या विरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीचालकाकडून लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार घडले आहेत, असे देवेरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत.
ही क्लिप देवरे यांचीचः जिल्हाधिकारी
सदरची क्लिप ही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 'लोकमत'ला सांगितले. देवरे यांनी या संदर्भात आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असून त्याची महिला आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. या क्लिपवर काय धोरण घ्यायचे, हे प्रशासनाने अद्याप ठरवले नसल्याचे भोसले म्हणाले.
स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी देवरे यांचा बचावः निलेश लंके
तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, तहसीलदारांच्या कारभाराबाबत अरुण आधळे हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत तहसीलदारांच्या कामकाजातील अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत. याबाबतचा अहवाल मंत्रालयात गेलेला आहे. त्या अहवालामुळे आपणावर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे तहसीलदारांनी अशी ऑडिओ क्लिप बनवून आपल्या बचावाचा प्रयत्न केला आहे.