पारनेरमध्ये शोले!
By Admin | Updated: December 19, 2015 23:51 IST2015-12-19T23:45:37+5:302015-12-19T23:51:34+5:30
पारनेर : ‘ती’च्यावर ‘त्या’चे प्रेम जडले़ ‘त्या’ने ‘ति’च्याकडे प्रेम व्यक्तही केले़ पण ‘ति’ने नकार दिला़ वारंवार प्रेमपत्र लिहून तो तिला द्यायचा़ पण ‘ति’ने स्वीकार केला नाही़

पारनेरमध्ये शोले!
पारनेर : ‘ती’च्यावर ‘त्या’चे प्रेम जडले़ ‘त्या’ने ‘ति’च्याकडे प्रेम व्यक्तही केले़ पण ‘ति’ने नकार दिला़ वारंवार प्रेमपत्र लिहून तो तिला द्यायचा़ पण ‘ति’ने स्वीकार केला नाही़ अखेर ‘त्या’च्यातील वीरू जागा झाला आणि बसंतीच्या प्रेमासाठी थेट महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन ‘तिला’ मागणी घातली़ तरीही ‘ति’चा होकार नाहीच मिळाला़ पण पोलिसांचा प्रसाद चांगलाच मिळाला आणि ‘त्याच्या’तील वीरूचे भूत उतरले़ पारनेरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला़
पारनेर महाविद्यालयात एफ.वाय़ बी.एस.स्सी.च्या वर्गात शिकणारा हा तरुण़ ‘त्या’चे महाविद्यालयातीलच पण बीसीएसला असणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडले़ त्याने अनेकवेळा तिला प्रेमाची मागणी घातली़ तिच्या मागे-मागे फिरला़ एकांटी गाठली़ प्रेमासाठी विनवणी केली़ लव्हलेटर लिहिले़ त्याचा हा टुकारपणा तिला मान्यच नव्हता़ ती नकारावर ठाम होती़ एकतर्फी प्रेमात रात्रीचं जागणं आणि दिवसा तिचा पाठलाग करणं त्याचं सुरुच होतं़ मित्रांमार्फतही तिचं मन वळविण्याचा त्यानं प्रयत्न केला़ पण तिने दाद दिलीच नाही. अखेरीस त्याच्यातील ‘वीरू’ जागा झाला़ आणि ‘त्या’ बसंतीसाठी या ‘वीरू’ने थेट महाविद्यालयाचा चौथा मजला गाठला़ चौथ्या मजल्यावर गेल्यानंतर कठड्यावरुन पाय खाली सोडून त्याने बसंतीला मागणी घातली़ मात्र, ‘ती’ तिथे नव्हती़ उंचीवर गेल्यामुळे हा ‘वीरू’ नक्की कोण आहे व त्याची ‘बसंती’ कोण आहे, याचा कुणालाच मेळ लागला नाही. पण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली़ प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी पोलिसांना कळविले़
वर कोणी जाण्याचा प्रयत्न केल्यास तो खाली उडी टाकण्याची धमकी देत होता़ शिक्षक त्याला खाली उतरण्याची विनवणी करीत होते़ अखेरीस एक प्राध्यापक लपतलपत चौथ्या मजल्यावर पोहोचले आणि कठड्यावरून ‘त्या’ला मागे खेचल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. सुमारे अर्धा ते तासभर हा प्रकार सुरू होता. पोलीस आल्यानंतर त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. पालकांना बोलावून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
(तालुका प्रतिनिधी)
गुरुवारी ‘तो’ विसापूरला आत्महत्या करायला गेला होता़ परंतु तेथे गेल्यानंतर त्याचा विचार बदलला आणि शुक्रवारी महाविद्यालय गाठले़ आपण आत्महत्या करणार असल्याची एक चिठ्ठी त्याच्या खिशात होती़ तर ‘होकार दे, अन्यथा कॉलेजवरुन उडी घेईन’, अशी धमकी एका वहीत लिहून तो तिला देण्याचा प्रयत्न करीत होता़, परंतु तिने वही घेतली नाही़