‘पारनेर’ अखेर भाडेतत्वावर

By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:27:29+5:302014-08-23T00:43:50+5:30

पारनेर : निविदाधारकांनी ठेंगा दाखविल्यावर राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना म्हस्केवाडी येथील उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या ‘राशि शुगर लिमीटेड’ला आठ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला.

'Parner' leased at the end | ‘पारनेर’ अखेर भाडेतत्वावर

‘पारनेर’ अखेर भाडेतत्वावर

पारनेर : पारनेर साखर कारखान्याच्या विक्रीसाठी दोन वेळा निविदा काढुनही निविदाधारकांनी ठेंगा दाखविल्यावर राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना म्हस्केवाडी येथील उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या ‘राशि शुगर लिमीटेड’ला आठ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. यामुळे येत्या हंगामापासूनच कारखाना सुरू होण्याची चिन्हे आहेत.
पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला होता व त्याची निविदाही प्रसिध्द केली होती.याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार विजय औटी, कामगार नेते आनंद वायकर व शेतकऱ्यांच्यावतीने सुभाष बेलोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्री विरोधात याचिका दाखल केली होती. तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे दाद मागितली होती.
मात्र विक्रीसाठी कोणतीच निविदा आली नसल्याचे राज्य बँकेने न्यायालयात सांगितल्यावर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. व त्यानंतर पुन्हा दोनदा निविदा प्रसिध्द केली होती. दोन्ही निविदांमध्ये निविदाधारकांनी ठेंगा दाखविल्याने राज्य बँकेसमोर ‘पारनेर’ बाबत मोठा पेच निर्माण झाला होता.
उद्योजक शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पारनेर साखर कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली होती, परंतु विक्री घेण्याऐवजी भाडेतत्वावर दिल्यास शेतकऱ्यांची कामधेनू वाचेल असे त्यांचे म्हणणे होते. यावेळी शिंदे यांनी भाडेतत्वावरील प्रस्तावही राज्य बँकेला दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी लक्ष घालून पारनेर साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घ्यावा, असे सुचविले होते.
दरम्यान, त्यानुसार राज्य बँकेने १४ आॅगस्ट रोजी निर्णय घेऊन ‘राशि शुगर’ चे प्रमुख राजेंद्र शिंदे यांना तसे पत्र देण्यात आले. आठ वर्षे भाडेतत्वावर देताना राज्य बँकेने सध्याच्या अठ्ठावीस कोटींचा कर्जाचा हिशोब धरला आहे. राज्य बँकेने ‘राशि शुगर’ ला पत्र दिल्यानंतर आता दोन दिवसांत पुढील करारनामा करण्यात येणार असून त्यानंतर ‘पारनेर’चा ताबा त्यांना देण्यात येणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)
या हंगामात कारखाना सुरू होणार
पारनेर साखर कारखाना ‘राशि शुगर’ ला चालविण्यास देण्यात आल्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता आठवडाभरात होईल. नवीन हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होत असल्याने मशिनरी यंत्रणा, इतर सुविधा उपलब्ध करून मिळण्यात महिनाभराचा कालावधी लागेल व या हंगामातच कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकने घेतल्यानंतर प्रथम ‘लोकमत’नेच राज्य बँकेचा डाव उघड करून पारनेरकरांना जागरूक केले होते. त्यानंतर अण्णा हजारेंसह सर्वपक्षीय नेते न्यायालयात गेले होते.
‘राशि शुगर’ ला पत्र
पारनेर साखर कारखाना ‘राशि शुगर इंडिया लिमिटेड’ यांना आठ वर्ष भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. याबाबत आता प्रक्रिया सुरू आहे.
- प्रमोद पाटील, अवसायक, पारनेर कारखाना,
- अरूण ठाणगे, कार्यकारी संचालक पारनेर कारखाना
प्रयत्नांना यश
पारनेर तालुक्यातील शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी आपण पारनेर साखर कारखाना चालविण्यास घेण्याचे निश्चित केले होते. राज्य बँकेनेही आपल्या कंपनीला ‘पारनेर’ आठ वर्षांसाठी भाडेतत्वावर दिला आहे.
- राजेंद्र शिंदे, प्रमुख, राशि शुगर लि.

Web Title: 'Parner' leased at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.