लिंगाळेश्वर मंदिराच्या ओसाड माळरानावर फुलविले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:54+5:302021-06-21T04:15:54+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी येथील तीन वृक्ष मित्र अवलियांनी बारा वर्षाचे तप करून लिंगाळेश्वर मंदिर परिसरातील ओसाड माळरानावर विविध ...

लिंगाळेश्वर मंदिराच्या ओसाड माळरानावर फुलविले नंदनवन
श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी येथील तीन वृक्ष मित्र अवलियांनी बारा वर्षाचे तप करून लिंगाळेश्वर मंदिर परिसरातील ओसाड माळरानावर विविध प्रकारचे झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. त्यामुळे परिसरात सकाळी दशक्रिया विधी आणि संध्याकाळी वाढदिवसाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. परिसर झाडी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला आहे.
नागवडे कारखान्याच्या दक्षिण बाजूला लोकसहभागातून लिंगाळेश्वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. मात्र सभोवतालचा परिसर ओसाड होता. सेवानिवृत्त मेजर बापूराव धुमाळ, बापूराव तुकाराम जंगले, वसंतराव ढगे यांनी रामप्रहरी लिंगाळेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन परिसरात जंगली झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. परिसरात वटवृक्ष, गुलमोहर, नीलगिरी, नारळ तसेच गुलाब, मोगरा, जास्वंदी, पारिजातक, आंबा, चिंचेची झाडे लावली. यासाठी परिसरातील नागरिकांनी मदत केली आहे.
या झाडांचे संगोपन परिसराची स्वच्छता करण्यासाठी दररोज दोन श्रमदान करण्याचा उपक्रम चालू ठेवला. त्यामुळे लिंगाळेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना फुले उपलब्ध झाली आहेत. आता परिसरात ५० चिंचेची झाडे लावण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे.
----
काकस्पर्श अन् स्वच्छता
पूर्वी झाडी नसल्याने दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नव्हता. परंतु, आता झाडीमुळे कावळ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काकस्पर्श होत असून येथे होणाऱ्या दशक्रिया विधीचे प्रमाणही वाढले आहे. परिसरात अस्वच्छता वाढू नये यासाठी तिघेही दशक्रियेनंतर स्वच्छता करतात.
----
वृक्षसेवेतच ईश्वर दिसतो...
लिंगाळेश्वर जागृत देवस्थान आहे. तो परिसर वृक्ष आणि पक्ष्यांनी प्रसन्न व्हावा यासाठी आम्ही वृक्षवेली संवर्धनाचे काम हाती घेतले. या कामात आम्हाला लिंगाळेश्वर महाराजांचे दर्शन होते, अशी भावना बापूराव धुमाळ, बापूराव जंगले, वसंतराव ढगे यांनी व्यक्त केली.
------
२०श्रीगोंदा फॅक्टरी
श्रीगोंदा फॅक्टरी येथील लिंगाळेश्वर मंदिर परिसरातील हिरवाई फुलविणारे तिघे ग्रामस्थ.