तृप्ती देसार्इंच्या अगोदर पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-02T23:56:42+5:302016-04-03T03:49:19+5:30
पाथर्डी : शनिशिंगणापुरातील शनी चौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले

तृप्ती देसार्इंच्या अगोदर पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन
पाथर्डी : शनिशिंगणापुरातील शनी चौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले. महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंडे यांनी हे शनिदर्शन घेतले. यापूर्वी महिला या मंदिराच्या चौथऱ्यावर जात नव्हत्या़ त्यामुळे चौथऱ्यावर जावून शनिला तेल वाहून दर्शन घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
शिंगणापुरात शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा वाद गाजत असतानाच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने शिरूर तालुक्यातील पारगांव येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या़ तेथून त्या कारने पाथर्डी मार्गे आष्टी तालुक्यातील धामणगावकडे जाताना पाथर्डी शहरातील नाथनगर येथील शनी मंदिरात दर्शनासाठी आल्या़ त्यांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तेल वाहिले़ या मंदिरात आजवर कोणाही महिलेने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले नाही़ मात्र, पंकजा मुंडे यांनी ही परंपरा मोडीत काढली़ यावेळी त्यांच्यासमवेत आष्टीचे आ.भीमराव धोंडे, माजी आ.दगडू बडे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राहुल कारखेले, अशोक चोरमले आदी उपस्थित होते. दर्शनानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या़ महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला़ त्यानंतर शनिवारी मुंडे यांनी चौथऱ्यावर जाऊन शनिचे दर्शन घेतले. या घटनेची सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे़
(तालुका प्रतिनिधी)