पद्मश्री विखे यांनी समाजाला दिशा दिली
By Admin | Updated: August 29, 2014 23:38 IST2014-08-29T23:27:53+5:302014-08-29T23:38:16+5:30
शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्राला डॉ. विखे यांनी नवी दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.

पद्मश्री विखे यांनी समाजाला दिशा दिली
अहमदनगर : शेतकऱ्यांचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. पूर्वी शहराच्या विकासासाठी झटणारे अनेकजण होते. पण ग्रामीण भागाच्या विकासाची पोकळी भरून काढणारे कोणी नव्हते. या काळात सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतीय शेती, शेतकरी आणि उद्योजकाला नवीन प्रेरणा देण्यासाठी १९५० मध्ये आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना निर्माण झाला. शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्राला डॉ. विखे यांनी नवी दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. कार्यक्रमाला आत्माचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गिरमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक राजेंद्र पाटील, वसंतराव कापरे, जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार, जिल्हा अधीक्षक अंकुश माने, उपसंचालक संभाजी गायकवाड, शिवाजी आमले, दिलीप देवरे, विष्णू जरे, विलास नलगे, डी.पी.देवरे, सबाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
कवडे म्हणाले, शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्रात नवनवीन परंपरा निर्माण करणाऱ्या पद्मश्री विखे पाटील यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून अनेक नवीन योजना राबविल्या. याव्दारे कारखाना कार्यक्षेत्रातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात लक्षणीय सुधारणा झाली. उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, नदीवरील बंधारे या शिवाय अनेक छोट्या सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला. शेती सोबत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक अधीक्षक माने यांनी केले.