अडचणींवर मात करत मुख्याध्यापकांनी वाटले गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:19+5:302021-03-24T04:19:19+5:30
दरवर्षी समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. प्रति विद्यार्थी ३०० रुपये याप्रमाणे ...

अडचणींवर मात करत मुख्याध्यापकांनी वाटले गणवेश
दरवर्षी समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. प्रति विद्यार्थी ३०० रुपये याप्रमाणे दोन गणवेश जोडीसाठी दरवर्षी ६०० रुपये मंजूर होतात. शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) मार्फत गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना दिले जातात. या योजनेत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती, तसेच दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले यांचा समावेश होतो. परंतु यंदा कोरोनामुळे राज्यातील शाळा अद्याप सुरू न झाल्याने एकाच गणवेशासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून डिसेंबर २०२० मध्ये तालुकानिहाय अनुदान वर्ग करण्यात आले. शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांना गणवेशासाठी मोठी कसरत करावी लागली. तरीही त्यावर मात करीत मुख्याध्यापकांनी हे उद्दिष्ट पूर्ण केले.
---------------
जि.प.च्या एकृण शाळा - ३५७२
गणवेशाचे एकूण लाभार्थी - १६४३३०
मुले -५०६५९
मुली -११३६७१
-----------
गणवेशासाठी ४ कोटी ९३ लाखांचा निधी
गणवेशासाठी एकूण १ लाख ६४ हजार ३३० लाभार्थी असून एका गणवेशासाठी प्रतिलाभार्थी ३०० रुपये याप्रमाणे ४ कोटी ९२ लाख ९९ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून जिल्हा परिषदेला वर्ग झाले.
-----------
मुख्याध्यापकांसमोरील अडचणी
गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. यंदा कोरोनामुळे समितीच्या बैठका वेळेवर होण्यात अडचणी आल्या. त्यामुळे गणवेशाचे कापड खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापकांनाच धावपळ करावी लागली. दुसरी मुख्य अडचण शाळा बंद असल्याने मुलांचे माप घेण्याची होती. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी मुलांच्या घरी जाऊन माप घेतले. अशा अनेक अडचणींचा सामना करीत अखेर मुलांना गणवेश वाटप झाले.
----------
सध्या जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होतात. परंतु शासनाने इतर खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांनाही गणवेश वाटप केला पाहिजे. मुख्याध्यापक संघटनेने याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी केलेली आहे.
- सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
--------
फोटो - २३ड्रेस डमी १,२,३,४,