शाळाबाह्य मुलं आली शाळेत
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:15:50+5:302014-07-27T01:08:13+5:30
अहमदनगर : कुटुंबाचा मोठा पसारा घेऊन पालावर राहायचं, मोठ्यांनी मजुरीला जायचं अन् पोरांनी दिवसभर गलोर हाती घेऊन शिकार करायची हेच त्यांचे रोजचे काम.
शाळाबाह्य मुलं आली शाळेत
अहमदनगर : कुटुंबाचा मोठा पसारा घेऊन पालावर राहायचं, मोठ्यांनी मजुरीला जायचं अन् पोरांनी दिवसभर गलोर हाती घेऊन शिकार करायची हेच त्यांचे रोजचे काम. शिक्षणाचा कायदा त्यांच्या गावीही नाही. पण शिक्षकांनी हार मानली नाही. त्या पालकांचे व मुलांचे समुपदेशन करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि ज्या हातात दिवसभर गलोर असायची आज त्याच हातात पाटी आणि पेन्सील पाहून पालावर नवी पहाट झाल्याचा आनंद होत आहे.
भिंगारजवळील ब्रह्मतळ्याच्या काठावर उघड्या-बोडक्या माळरानावर चांगदेव काळे हे आपल्या सहा मुलांसमवेत राहतात. मोलमजुरी करणं अन् शिकारी करायची यावरच त्यांचा उदरनिर्वाह बेतलेला. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मनाजोगते कामही मिळत नाही. कुटुंबाची अशी आर्थिक घडी विस्कटलेली असताना मुलांचं कसलं आलंय शिक्षण. यामुळे पालावरच्या मुलांनी शिक्षण अर्धवट सोडून सकाळी भाकरी मागायची आणि दिवसभर शिकार करायची असा त्यांचा दिनक्रम. बुऱ्हाणनगर केंद्राचे केंद्र प्रमुख तुकाराम कातोरे यांनी पुढाकार घेत शिक्षकांसमवेत पाल गाठले. आणि मुले शाळेत न येण्याची कारणे विचारली. त्यावेळी पालातून आर्थिक दारिद्र्याची करूण कहानी कथित झाली. या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या तर? असा आश्वासक प्रश्न शिक्षकांनी केल्यावर मुलांचे चेहरे कावरे-बावरे झाले.
या पालावर आठ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले़ भिंगार हायस्कूलचे रमेश वाघमारे, सुलभा कुलकर्णी, होनाजी गोडाळकर, अॅबट विद्यालयाचे प्राचार्य एकनाथ जगताप, राजेंद्र लोखंडे, जि.प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता भुजबळ, मिनाज शेख आदींनी या मुलांना शाळेचा गणवेश, शाळेचे दप्तर, वह्या-पुस्तके, इतर लेखन साहित्य व खाऊही दिला. शिक्षकांनी त्या मुलांचे पालकत्वच स्वीकारले. त्यांना चार चाकी गाडीत बसवून शाळेत आणले.
शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील मुलांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन झाल्यावर मुलांनी शाळेत रोज येण्याचा निर्णय घेतला. सध्या ही बालके नियमित शाळेत येतात. रात्री मिनमिणत्या दिव्यावर अभ्यास करून शिक्षणाचे धडे गिरवतात. (प्रतिनिधी)
भटक्या जाती-जमातीमधील अशी हजारो मुले अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. काही शाळाबाह्य आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मात करण्यासाठी शिक्षकांनीच आता पुढाकार घ्यायला हवा.
-तुकाराम कातोरे, केंद्र प्रमुख, बुऱ्हाणनगर.