जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही कोल्हे गटाचा कामांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:33+5:302021-04-01T04:21:33+5:30
कोपरगाव : कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर विकास कामे नामंजूर केली, म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे माझे विशेषाधिकार वापरून अपील दाखल केले ...

जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही कोल्हे गटाचा कामांना विरोध
कोपरगाव : कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर विकास कामे नामंजूर केली, म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे माझे विशेषाधिकार वापरून अपील दाखल केले होते. त्यावर दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी निर्णय दिल्यानंतर शहरातील २८ कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, इतके सर्व घडून गेल्यानंतरही कोल्हे गटाने नगर परिषदेला सदरची कामे करू नका, असे लेखी पत्र देऊन विरोध दर्शविला असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हटले आहे.
वहाडणे म्हणाले, कोल्हे गटाने राजकारण करून शहराचा विकास थांबवू नये. नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करायला तुम्ही विरोध करता ते नगरसेवक तुम्हाला काय म्हणत असतील याचा तरी विचार करा. १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाने बहुमताने केलेला ठराव क्र. ११ स्थगित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मार्चला दिलेला असूनही कोल्हे गटाची सतत विरोध करण्याची भूमिका कायम आहे. मात्र, अशा प्रकारच्या विरोधाला झुगारून विकासकामे मार्गी लागणार आहेत याची जनतेने खात्री बाळगावी. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा नेमका अर्थ काय हे समजून घ्या, नुसताच पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न थांबवा.