‘जन आरोग्य’तून अडीच टक्के कोरोनाबाधितांवरच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:50+5:302021-05-18T04:21:50+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३१ हजार ६३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. मात्र, महात्मा फुले जन ...

Only two and a half percent of coronary heart disease patients are treated | ‘जन आरोग्य’तून अडीच टक्के कोरोनाबाधितांवरच उपचार

‘जन आरोग्य’तून अडीच टक्के कोरोनाबाधितांवरच उपचार

अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३१ हजार ६३५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. मात्र, महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत केवळ ५ हजार ७१३ कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अवघ्या अडीच टक्के कोरोनाबाधितांनाच या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो रुग्ण या योजनेपासून दूरच राहिल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनांचा लाभ घेता येणार असून, संलग्न रुग्णालयांनी श्वसनसंस्थेच्या लक्षणांशी संबंधित २० हजारांच्या पॅकेजमध्ये कोरोनाबाधितांना मोफत उपचार देणे अपेक्षित आहे. मात्र, या योजनेंतर्गत सामान्य रुग्णांना देण्यात आलेल्या लाभाचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य दिसून आले आहे. या योजनेंतर्गत पिवळे, केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना लाभ घेता येईल. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व आधार कार्ड आवश्यक आहे. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना उपचार घेण्यास सुलभ व्हावे, आर्थिक चणचण त्यांच्यासमोर राहणार नाही. यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना कोरोनासाठी अमलात आणली. या योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. मात्र, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांनी आतापर्यंत केवळ ५ हजार ७१३ कोरोनाबाधितांवरच या योजनेंतर्गत उपचार केले आहेत. उर्वरित रुग्णांना आर्थिक झळ सहन करीत उपचार घ्यावे लागलेले आहेत. त्यामुळे केवळ अडीच टक्के रुग्णांवरच मोफत उपचार करण्यात आल्याचे दिसते आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे खासगी रुग्णालयांचे प्रशासन या योजनेंतर्गत उपचार करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते. नगर जिल्ह्यात ४२ खासगी रुग्णालयांमधून या योजनेंतर्गत उपचार करतात.

-------------

...तर करा तक्रार

खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास, अथवा उपचारांची बिले आकारल्यास योजनेचे जिल्हा रुग्णालयात समन्वय कार्यालय आहे. तिथे नागरिक तक्रार करू शकतात. आतापर्यंत तब्बल एक हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील ५० टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच जिल्हा समन्वयक (जिल्हा रुग्णालय) यांच्याकडेही लेखी तक्रार करता येईल.

---------------

या योजनेंतर्गत... केवळ २० हजारांचे पॅकेज असल्याने खासगी रुग्णालये रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

---

...अशी करा नोंदणी

या योजनेशी संलग्न ४२ रुग्णालयात आरोग्य मित्रांकडून नोंदणी करता येईल. तसेच कागदपत्र जवळ नसली, तरी इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन देऊन उपचार घेता येतील आणि नंतर कागदपत्रे मागविता येतील. कागदपत्रांची फोटो कॉपी देता येईल. व्हॉट्सॲप, ई-मेलवरही पाठविता येईल. शिधापत्रिकेची ऑनलाईन प्रतही सादर करता येईल.

---------

केवळ ४२ रुग्णालयात उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ४२ खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यास २० हजार रुपयांचे पॅकेज राज्य शासनाच्यावतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात येते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत शासकीय व खासगी रुग्णालयात २ लाखांच्यावर रुग्णांनी उपचार घेतले आहेत. काही रुग्णालयांनी तर या योजनेंतर्गत उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होत असून, आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

---------

कोरोनाशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये- ४२

एकूण कोरोनाबाधित- २,३१,६३५

एकूण कोरोनामुक्त-२,०७,१३८

आतापर्यंत झालेले मृत्यू-२,४८१

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण-२,२०१६

योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण-५,७१३

--

डमी आहे

Web Title: Only two and a half percent of coronary heart disease patients are treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.