जिल्ह्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:54+5:302021-04-09T04:21:54+5:30
राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, तर दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना ...

जिल्ह्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, तर दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस दिली गेली. १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे लसीकरणाची मागणी वाढली आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण १६५ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे. त्यात जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, २२ ग्रामीण रुग्णालय, ९ महापालिकेची केंद्र, ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर १ कॅन्टेनमेंट केंद्रात लसीकरण केले जात आहे. यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवारीच लसीकरण होते.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १२ हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी २ लाख २७ हजार ४०४ पहिल्या डोसला, तर २६ हजार ६५५ दुसऱ्या डोसला असे एकूण
२ लाख ४८ हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, सध्या तीन दिवस पुरेल एवढा म्हणजे ४० हजार डोसचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी २५ हजार डोस बुधवारी, तर १६ हजार डोस मंगळवारी प्राप्त झाले. हे सर्व डोस मागणीप्रमाणे त्या-त्या लसीकरण केंद्रांना वाटून आले आहेत. त्यातून तीन दिवस लसीकरण होऊ शकते.
--------------
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेककडून नगर जिल्ह्याला लसीचा पुरवठा होतो. जिल्हा प्रशासनाकडून अनेकदा दोन ते तीन लाखांच्या लसीची मागणी करण्यात येते; मात्र त्या तुलनेत केवळ २५ ते ३० हजार एवढेच डोस जिल्ह्याला प्राप्त होतात. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवत आहे.
-----------
नगर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात ४१ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. हा साठा तीन दिवस पुरेल एवढा आहे.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.