आश्रमशाळा शिक्षकांना फक्त ७५ रुपये रोजंदारी
By Admin | Updated: June 26, 2014 00:42 IST2014-06-25T23:40:33+5:302014-06-26T00:42:56+5:30
अहमदनगर : आदिवासी विकास आश्रमशाळांमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या १५ रुपये तासिका तत्वावर काम करीत आहेत़

आश्रमशाळा शिक्षकांना फक्त ७५ रुपये रोजंदारी
अहमदनगर : आदिवासी विकास आश्रमशाळांमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या १५ रुपये तासिका तत्वावर काम करीत आहेत़ या रोजंदारीवरील शिक्षकांना कायम करावे, या मागणीसाठी न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना आता राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी टी़ एम़ पिचड यांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे़
आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात २५ शासनमान्य आश्रमशाळा आहेत़ या आश्रमशाळांमध्ये सुमारे १८०० कर्मचारी कार्यरत आहेत़ हे कर्मचारी रोजंदारी व तासिका तत्वावर नेमण्यात आले आहेत़ रोजंदारी किंवा तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना गेल्या दहा वर्षापासून तासाचे अवघे १५ रुपये मानधन दिले जाते़ त्यानुसार या शिक्षकांना दिवसाचा ७५ रुपये रोज दिला जातो़ रोजंदारीवरील शिक्षकांना कायम करावे, या मागणीसाठी उपोषणे, मोर्चा, धरणे, अन्न त्याग अशी आंदोलने करुन या शिक्षकांनी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला़ मात्र, आदिवासी विकास विभागाने या शिक्षकांना प्रत्येकवेळी आश्वासने दिली़
दिंडोरीचे (नाशिक) आमदार धनराज महाले यांनी २९ मार्च २०१२ रोजी झालेल्या प्रधान सचिवांच्या बैठकीत आदिवासी विकास विभागातील तासिका शिक्षकांना कायम करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता़ या बैठकीत प्रधान सचिवांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आदिवासी विभागाच्या आयुक्तांना दिले होते़ मात्र, कार्यवाही झाली नाही़ ३१ मे २०१२ रोजी आदिवासी विकास आयुक्तालयाने शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी व तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव मागविले होते़ व त्यासाठी ५ जून २०१२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती़ मात्र, या बैठकीतही प्रस्ताव सादर केले नाही़
त्यानंतर २ जानेवारी व १३ जानेवारी, ७ मार्च व १४ मार्च २०१४ रोजी पुन्हा प्रस्ताव मागविले़ मात्र, त्यावर कार्यवाही न करता आदिवासी विकास विभागाने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली़ त्यामुळे या शिक्षकांनी सरकारच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ जुन्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय भरती करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़
रोजंदारीवरील शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यामुळे या शिक्षकांना चक्क कामावरुनच कमी करण्याचा अजब न्याय आदिवासी विकास विभागाच्या राजूर प्रकल्पाने घेतला़ त्यामुळे ४१ शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ कोणत्याही कर्मचाऱ्यास किमान १६२ रुपये रोजंदारी द्यावी, हा सरकारचा नियमही राजूर प्रकल्पाने पायदळी तुडविला आहे़ (प्रतिनिधी)
पिचड यांच्याकडून अपेक्षा
तत्कालीन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांना आ़ मधुकरराव पिचड यांनी २७ मार्च २०१३ रोजी आश्रमशाळा शिक्षकांना कायम करण्याबाबत पत्र पाठविले होते़ या पत्रात पिचड यांनी म्हटले होते की, आश्रमशाळांमधील रोजंदारी व तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर झाला आहे़ या शिक्षकांनी आदिवासी विभागात मोलाचे योगदान दिले आहे़ त्यामुळे या शिक्षकांना कायम करण्यास हरकत नाही़ त्यावेळी मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते़ आता मधुकरराव पिचड हे आदिवासी विकासमंत्री आहेत़ त्यामुळे पिचड हे या शिक्षकांना कायम करतील, अशी अपेक्षा आदिवासी विकास आश्रमशाळा रोजंदारी शिक्षक व कर्मचारी संघटनेकडून व्यक्त होत आहे़
विधान परिषदेच्या अधिवेशनात आ़ विनोद तावडे, रामनाथ मोते आदींनी शासकीय आश्रमशाळातील तासिका शिक्षकांच्या वेठबिगारीबाबत प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर तत्कालीन आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी या शिक्षकांना कायम करण्याचा प्रस्ताव कार्यवाहीत असल्याचे सांगितले होते़ मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही़
रोजंदारीवरील शिक्षकांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे़ त्यामुळे ४१ कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे़ त्यांना पुन्हा कामावर घ्यायचे की नाही, याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे मार्गदर्शन मागविले आहे़
- डॉ़ टी़ एम़ पिचड,
प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, राजूर