केवळ १५१ गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज

By Admin | Updated: September 12, 2016 23:11 IST2016-09-12T23:07:20+5:302016-09-12T23:11:41+5:30

चंद्रकांत शेळके, अहमदनगर धार्मिक कार्यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात अधिकृत वीजजोड देण्याची सुविधा असतानाही जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी महावितरणला याबाबत ठेंगा दाखवला आहे.

Only 151 Ganesh mandals have authorized power | केवळ १५१ गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज

केवळ १५१ गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज

चंद्रकांत शेळके, अहमदनगर
धार्मिक कार्यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात अधिकृत वीजजोड देण्याची सुविधा असतानाही जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी महावितरणला याबाबत ठेंगा दाखवला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तब्बल ३५७३ गणेश मंडळांची नोंदणी झालेली असताना केवळ १५१ मंडळांनीच अधिकृत वीजजोड घेतले आहेत.
नगर जिल्ह्यात २८६० सार्वजनिक, २०८ खासगी, तर ५०५ एक गाव एक गणपती अशा एकूण ३५७३ गणेश मंडळांनी पोलीस ठाण्यांत नोंद केली आहे.
याव्यतिरिक्त नोंदणी न झालेले शेकडो मंडळे आहेत. परंतु यातील केवळ १५१ मंडळांनीच अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. कोणत्याही सार्वजनिक धार्मिक कारणासाठी महावितरण घरगुती दरापेक्षाही कमी दरात तात्पुरता वीजजोड संबंधित मंडळ किंवा संस्थेला देत असते. त्याची प्रक्रियाही सोपी आहे. परंतु अनेक मंडळे महावितरणकडून अधिकृत वीजजोड घेतच नाहीत. शेजारील घरातून किंवा मग थेट आकडा टाकून बिनदिक्कतपणे वीज वापरली जाते. गणेशोत्सवात देखावे किंवा गणपती आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. हलत्या देखाव्यांच्या यंत्रणेसाठी किंवा विद्युत रोषणाईसाठी जादा भार आवश्यक असतो. घरगुती किंवा आकडा टाकून या यंत्रणा वापरल्यास शॉर्ट-सर्किटचा धोका कैक पटींनी वाढतो. त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, ही बाब मंडळांबरोबरच महावितरणनेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मंडळे अनधिकृत वीज वापरत असतानाही महावितरणने काहीही कारवाई केलेली नाही. धार्मिक कार्यात विघ्न नको म्हणून ते सोईस्कर दुर्लक्ष करतात, परंतु एखादा अपघात झाला, तर अप्रत्यक्षरित्या तेही या घटनेस जबाबदार ठरतात.

Web Title: Only 151 Ganesh mandals have authorized power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.