केडगावच्या ओंकारनगर शाळेत ऑनलाईन योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:03+5:302021-06-22T04:15:03+5:30
केडगाव : अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ...

केडगावच्या ओंकारनगर शाळेत ऑनलाईन योग दिन साजरा
केडगाव : अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, विद्यार्थी व पालक यांनी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.
कोरोनामुळे याहीवर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे ओंकारनगर शाळेने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवस अगोदरच शाळेतील शिक्षकांनी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांचे व्हिडिओ पाठवले. तसेच विद्यार्थ्यांकडून योगासनांच्या प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला.
योग दिनाच्या दिवशी सकाळी सर्वांनी एकाचवेळी विविध आसने, सूर्यनमस्कार, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके केली. यावेळी प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण मुळे, उपाध्यक्ष रवींद्र पानसरे, सदस्य सविता लोखंडे, संजय वर्तले यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.