नऊ महिन्यांनंतर कांदा नीचांकी स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:38+5:302021-03-09T04:23:38+5:30

अहमदनगर : गेल्या आठ ते नऊ महिन्यांत तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत गेलेले कांद्याचे दर पहिल्यांदाच घसरून दोन हजारांपर्यंत आले ...

Onions at low levels after nine months | नऊ महिन्यांनंतर कांदा नीचांकी स्तरावर

नऊ महिन्यांनंतर कांदा नीचांकी स्तरावर

अहमदनगर : गेल्या आठ ते नऊ महिन्यांत तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत गेलेले कांद्याचे दर पहिल्यांदाच घसरून दोन हजारांपर्यंत आले आहेत. नगर बाजार समितीत सोमवारच्या लिलावात कांद्याला १६०० ते २००० रुपये भाव निघाला. गेल्या नऊ महिन्यांतील हा नीचांकी दर आहे.

मागील वर्षी एप्रिल-मे मध्ये गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भाव घसरले. परिणामी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला. पुढे जून, जुलैमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली. या पावसाने चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने पुन्हा भाव वाढले. त्यातच हा पाऊस सलग डिसेंबरपर्यंत राहिल्याने लाल कांद्याची अपेक्षित लागवड झाली नाही. त्यामुळे कांद्याचे भाव चढेच राहिले. इतर राज्यांतही कांद्याचे उत्पादन कमी राहिल्याने डिसेंबर २०२० मध्ये कांदा तब्बल दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेला होता.

दरम्यान, भाव चांगले असल्याने पाऊस उघडल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली. हाच कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. तरीही आतापर्यंत कांद्याचे भाव टिकून होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला पाच हजारांपर्यंत भाव होता; परंतु आता गावरान कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने कांद्याचे दर कमी होत आहेत.

सोमवारी नगर बाजार समितीत ७६ हजार ८०६ गोण्या (४२,२४३ क्विंटल) कांद्याची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १६०० ते २००० रुपयांचा भाव निघाला.

------------

सोमवारच्या लिलावातील भाव

प्रथम प्रतवारी १६०० ते २०००

द्वितीय प्रतवारी १४०० ते १६००

तृतीय प्रतवारी ९०० ते १४००

चतुर्थ प्रतवारी ५०० ते ९००

Web Title: Onions at low levels after nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.