काेरोनाच्या निर्बंधांमुळे कांद्याचा पुन्हा वांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:05+5:302021-04-09T04:22:05+5:30
शेवगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायांवर कडक निर्बंध घातल्याचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. कांद्याची मागणीच घटू ...

काेरोनाच्या निर्बंधांमुळे कांद्याचा पुन्हा वांदा
शेवगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यवसायांवर कडक निर्बंध घातल्याचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. कांद्याची मागणीच घटू लागल्याने भावही गडगडू लागले आहेत. त्यामुळे कांद्याचा पुन्हा वांदा झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
सध्या शेवगाव बाजार समितीच्या आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मात्र त्या प्रमाणात कांद्याला मागणी नसल्याने कमी भाव मिळत आहे. कोरोनामुळे सध्या हॉटेल व्यवसाय बंद आहेत तसेच परदेशातूनही कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होत आहे.
सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कांदा बियाणे वाया गेले होते. त्यानंतर कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून बियाणे आणून कांदा लागवड केली होती. किलोला अगदी अडीच ते तीन हजार रुपये शेतकऱ्यांनी मोजले होते. त्यातच ते महागडे बियाणे खराब निघाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. काही जणांचे ५० टक्केही बियाणे उगवले नाही. गत महिन्यात झालेल्या गारपिटीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
भाव गडगडल्याने काढलेला कांदा साठवणूक करण्यासाठी तालुक्यात केवळ २० टक्के शेतकऱ्यांकडे चाळी आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवण करण्याची सुविधा नसल्याने ते शेतकरी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येत आहेत. बियाणे, लागवड, औषध फवारणी, खत, काढणी, वाहतूक असा एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. मात्र सद्य:स्थितीत केवळ चांगल्या कांद्याला ७०० ते ९०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.
--
परदेशातही लॉकडाऊन असल्याने कांद्याला मागणी नाही. यंदा उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्यात शेतकऱ्यांनी आणलेले बियाणं खराब निघाल्याने डेंगळ्या, फूट, जोडचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्यास आगामी काळात चांगला भाव मिळू शकतो.
- बापूसाहेब गवळी,
अध्यक्ष, कांदा मार्केट व्यापारी असो., शेवगाव
--
महागड्या दराने आणलेले बियाणे खराब निघाले. सुमारे ५० टक्के बियाणे उगवले नाही. त्यात गत महिन्यात झालेली गारपिटीने मोठे नुकसान झाल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्या तुलनेत कांद्याला मिळणारा सध्याचा दर लक्षात घेतला तर झालेला खर्च निघत नाही. नाफेडने कांदा खरेदी केंद्र सुरू करायला हवे.
-बाळासाहेब फटांगडे,
जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना