७० दिवसांनंतर कांदा बाजार गजबजला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:23+5:302021-06-04T04:17:23+5:30
केडगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे बंद झालेला कांदा बाजार तब्बल ७० दिवसांच्या प्रदीर्घ ...

७० दिवसांनंतर कांदा बाजार गजबजला!
केडगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे बंद झालेला कांदा बाजार तब्बल ७० दिवसांच्या प्रदीर्घ अवधीनंतर गुरुवारपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी १९ हजार ७६० कांदा गोण्यांची आवक झाली. कांदा बाजार मोठ्या अवधीनंतर गजबजला होता.
२५ मार्चपासून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सुरू असणारा कांदा बाजार बंद करण्यात आला होता. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती. अवकाळी व मान्सून पूर्व पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजून खराब झाला. यामुळे कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी सुरू झाली होती. ‘लोकमत’ने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा ‘कांद्याचा झाला वांदा’ या मथळ्याखाली मंगळवारच्या (दि. १) अंकात प्रसिद्ध केली होती.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नेप्ती उपबाजार येथे एक महिन्यानंतर फळे व भाजीपाला बाजार खरेदी-विक्री सुरू करण्यात आली. मात्र कांदा बाजार सुरू करण्याचे कोणतेच आदेश नव्हते. या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. अखेर नेप्ती उपबाजार समितीत सकाळी ७ ते ११ या वेळात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले. त्यानुसार बाजार समितीने गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू केले. मात्र त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले. कांद्याची आवक लिलावाच्या आदल्या दिवशी नेप्ती उपबाजार येथे सकाळी ७ ते ११ या वेळेत उतरविली जाते. एका वाहनासोबत एकाच शेतकऱ्याला प्रवेश देण्यात येत असून, त्याची आरोग्य तपासणी करूनच आत सोडले जात आहे. शेतकऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक असून, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सचिव अभय भिसे यांनी समितीच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
----
अठराशे ते एकवीसशेचा भाव..
१९ हजार ७६० कांदा गोण्यांची म्हणजे जवळपास १० हजार ८६८ क्विंटल कांदा आवक झाली. एक नंबरला १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन नंबर १०५० ते १८०० रुपये. तीन नंबर ६०० ते १०५० रुपये. चार नंबर ३०० ते ६०० रुपये.
---
नगर मार्केट यार्डात भुसार बाजार..
नगरच्या मार्केट यार्डमधील भुसारचा (अन्नधान्य) बाजारही बाजार समितीने सुरू केला. यात ३९४ क्विंटल अन्नधान्याची आवक झाली. नेप्ती उपबाजारात सुरू झालेल्या भाजीपाल्याची २९७ क्विंटल तर फळांची ९७ क्विंटल आवक झाली.
---
बाजार समितीत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी, व्यापारी, हमालांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसारच आत प्रवेश दिला जाणार आहे.
- अभिलाष घिगे,
सभापती, बाजार समिती, नगर
---
फोटो आहे.
030621\img-20210603-wa0157.jpg
नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरू