महिला दिनी २५१ महिलांच्या हस्ते एक हजार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:44+5:302021-03-09T04:23:44+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यातील आदर्श गाव मोरया चिंचोरे येथे जागतिक महिला दिनी २५१ महिलांच्या हस्ते एक हजार झाडे ...

महिला दिनी २५१ महिलांच्या हस्ते एक हजार वृक्षारोपण
नेवासा : नेवासा तालुक्यातील आदर्श गाव मोरया चिंचोरे येथे जागतिक महिला दिनी २५१ महिलांच्या हस्ते एक हजार झाडे लावण्यात आली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे येथे वर्षभर विविध उपक्रम राबवित आहेत.
गडाख यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावचा सर्वांगीण विकास करत दुष्काळी म्हणून ओळख असलेले मोरया चिंचोरे गाव आता सर्वच क्षेत्रात सुजलाम, सुफलाम केले आहे. महिलांना गावच्या विकासात व प्रत्येक उपक्रमात सक्रिय संधी देत सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही संधी उपलब्ध करून दिली. सोमवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून गावात २५१ महिलांच्या हस्ते एक हजार झाडे लावण्यात आली. यामध्ये कडुनिंब, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ या देशी वृक्षांचा समावेश आहे. फिजिकल डिस्टन्स पाळत महिलांनी वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण केले.
---
महिला दिनानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गावात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून नारीशक्तीचा गौरव केला. आम्ही वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना भाऊ मानून त्याचे जतन करणार आहोत.
-सुमन बाळासाहेब मोरे,
अध्यक्ष, प्रगती महिला बचत गट
---
प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया चिंचोरेत ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, वाचनालय, तंटामुक्ती, शाळा, वन व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, आदी समित्यांवर महिलाच कामकाज पाहतात. गावातील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, ध्वजारोहणासह विविध धार्मिक, सामाजिक कार्यासाठी महिलांना मान दिला जातो.
-जयश्री मंचरे,
सरपंच, मोरया चिंचोरे
---
०८ मोरया चिंचोरे
मोरया चिंचोरे येथे महिला दिनानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी महिला.