निरंतर साधनेतून एक लाख लोकांना ठेवले कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST2021-04-27T04:21:46+5:302021-04-27T04:21:46+5:30
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली आणि नगर येथील गावडे मळ्यातील ध्यान मंदिर, तसेच शहरातील इतर केंद्रांवरील योगसाधना बंद ...

निरंतर साधनेतून एक लाख लोकांना ठेवले कोरोनापासून दूर
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली आणि नगर येथील गावडे मळ्यातील ध्यान मंदिर, तसेच शहरातील इतर केंद्रांवरील योगसाधना बंद पडली. त्यानंतर २५ मार्च २०२० रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन योगसाधना सुरू झाली. त्यामध्ये आतापर्यंत एकही दिवस खंड पडला नाही. या उपक्रमाला रविवारी (दि. २५) चारशे दिवस पूर्ण झाले. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत ही योगसाधना घेतली जाते. त्यामध्ये शंभर लोक सहभागी होतात. त्यांचे आठ दिवस पूर्ण झाले की, दुसरे शंभर लोक सहभागी होतात. अशा एक लाख लोकांनी आतापर्यंत या साधनेत सहभाग घेतला. विशिष्ट दिवसांनी त्यांचा फॉलोअप वर्गही घेतला जातो. त्यामुळे ऑनलाईन सहभागी होणारे रोज योगसाधना करीत आहेत. अशा योगसाधनेमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढली. लोकांचे मनोबल, आत्मविश्वास वाढविण्यासाठी धडे देण्यात आले. आरोग्य चांगले राहण्यासाठी वर्षभरात ७० ते ८० तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक कृष्णा पेण्डम यांनी हा उपक्रम राबविला. आरोग्य, तणावमुक्त, व्याधीमुक्त राहण्यासाठी शिबिरे झाली. युवा नेतृत्व, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन कार्यशाळाही घेण्यात आल्या. या शिबिराचा पाच हजारजणांनी लाभ घेतला.
--------
कोविडमुळे नकारात्मक वातावरण आहे. अशा स्थितीत शरीर स्वास्थ्य राहण्यासाठी, मानसिक शांती, आनंद व उत्साह कायम ठेवण्यासाठी चारशे दिवसांपासून निरंतर साधना होते आहे. ही साधना अशीच पुढेही चालूच राहणार आहे. या उपक्रमामुळे अनेकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली. अनेकांचे मनोबल वाढले. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहिले. नियमित साधना करणारे कोरोनापासून दूर राहिले.
-कृष्णा पेण्डम, आयोजक व प्रशिक्षक
----------------
योगसाधना, व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित साधनेमुळे व्यायामाची, ध्यान साधनेची आवड निर्माण होते. नियमित साधनेमुळे साधना करणाऱ्या ९० टक्के लोकांना कोरोनाची बाधाच झाली नाही. नियमित साधना करणाऱ्या काहीजणांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, त्यांना कोणताही त्रास न होता ते सहीसलामत कोरोनामुक्त झाले.
-डॉ. रवीश पतंगे, आयुर्वेद व नाडी परीक्षातज्ज्ञ
---------------
फोटो- २६ कृष्ण पेण्डम