अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील घटना
By रोहित टेके | Updated: April 24, 2023 15:07 IST2023-04-24T15:06:58+5:302023-04-24T15:07:35+5:30
बाळासाहेब पंढरीनाथ बारसे (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील घटना
रोहित टेके, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर ): नगर-मनमाड महामार्गावर रस्त्याच्या बाजूला पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील राजस्थान हॉटेलजवळ सोमवारी (दि.२४) सकाळी ६.३० वाजेच्यापूर्वी घडली. बाळासाहेब पंढरीनाथ बारसे ( वय ४७, रा. येसगाव ता. कोपरगाव ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे करीत आहेत.