तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:23+5:302020-12-06T04:21:23+5:30
भाळवणी : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गोरेगाव चौकात खडी वाहतूक करणारा डंपर, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ...

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू
भाळवणी : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गोरेगाव चौकात खडी वाहतूक करणारा डंपर, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, छोटा टेम्पो या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास घडली.
सुदाम डेरे (३८, रा. पाडळी आळे, ता. पारनेर) असे मृताचे नाव आहे. संतोष नाथा डेरे (३७), किसन लक्ष्मण डेरे (३३, दोघेही रा. पाडळी आळे), अशी जखमींची नावे आहेत.
बेल्हा पाडळी (ता. पारनेर) येथील सुदाम डेरे, संतोष डेरे, किसन डेरे हे तीन शेतकरी भाळवणी येथील वजनकाट्यवर उसाचे वजन करण्यासाठी कल्याण-निर्मळ महामार्गावरून ट्रॅक्टर घेऊन येत होते. एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस होता. ते तिघेही टॅक्टरमध्येच होते. शनिवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ते भाळवणीजवळ पोहोचले. त्याचवेळी खडी घेऊन चाललेला डंपर (एमएच २० डीई ४७२६) ट्रॅक्टरच्या पाठीमागून भाळवणीकडेच येत होता, तर याचवेळी एक छोटा टेम्पो (एमएच ०५ ईएल ०३५७) कल्याणच्या दिशेने जात होता. तो ट्रॅक्टरजवळ आला होता. त्याचवेळी भरधाव डंपर चालकाला समोर चाललेला उसाचा ट्रॅक्टर दिसला नाही. त्यामुळे डंपरने ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली. समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोच्या मागील बाजूस दोन्ही वाहनांची धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टर ट्राॅलीसह बाजूच्या गटारात जाऊन पडला, तर डंपर विरुद्ध दिशेने रस्त्याच्या बाजूला पडला. यामध्ये ट्रॅक्टरचा अक्षरश: चक्काचूर झाला.
यात ट्रॅक्टरमधील सुदाम डेरे यांचा मृत्यू झाला. संतोष डेरे, किसन डेरे हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
फोटो तीन आहेत...
०५ भाळवणी ॲक्सिडेंट, १,२
भाळवणी येथील अपघातग्रस्त ट्रॅक्टर, छोटा टेम्पो, डंपर.