हुश्शऽऽ झाली एकदाची सीईटी
By Admin | Updated: May 6, 2016 18:41 IST2016-05-06T18:39:43+5:302016-05-06T18:41:45+5:30
अहमदनगर : सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) एकदाची पार पडली.

हुश्शऽऽ झाली एकदाची सीईटी
अहमदनगर : परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची विद्यार्थ्यांची घाई...पेपर सोडविताना झालेली दमछाक.... आणि पेपर देऊन बाहेर पडताना निकाल काय लागेल याची उत्सुकता अशा वातावरणात सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) एकदाची पार पडली. विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱ्यावरचा तणाव प्रकर्षाने जाणवला. शहरातील ६० केंद्रांवर २१ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी गुरुवारी सीईटी परीक्षेला हजेरी लावली़
चालू शैक्षणिक वर्षात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक परीक्षा (सीईटी) घेण्यात आली़ शहरातील विविध ६० केंद्रांवर २२ हजार १२३ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती़ पहिला फिजिक्स व केमिस्ट्रीचा पेपर प्रत्यक्षात सकाळी १० वाजता सुरू होणार होता़ मात्र पाऊणतास आधी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला़ प्रवेशपत्र तपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सकाळी १० वाजता सुरू झालेला पहिला पेपर ११़ ३० वाजता सुटला़ दुसरा बायोलॉजीचा दुपारी १२ वाजता सुरू झाला आणि १़३० वाजता संपला़
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठीचा तिसरा गणिताचा पेपर दुपारी ३ वाजता सुरू होऊन ४़ ३० वाजता संपला़ तिसऱ्या पेपरला १५ हजार २४५ विद्यार्थी हजर होते़ तर ३४९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली़
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रांवर वेळेवर पोहोचणे शक्य झाले़ बहुतांश विद्यार्थी खासगी वाहनाने आले होते़ न्यू आर्टस, रेसिडेन्शिअल, पेमराज सारडा, राधाबाई काळे महाविद्यालयांत केंद्रांची संख्या मोठी होती़ त्यामुळे महाविद्यालये परिसरात गर्दी होती़
महाविद्यालयांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या़ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने हजर होते़
उन्हाच्या तडाख्यात पालक केंद्र परिसरात तळ ठोकून होते़ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना देऊनही काही महाविद्यालयांनी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले नाही़
शहरात या परीक्षेमुळे विविध रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्याचा त्रास सर्वसामान्यांना झाला.(प्रतिनिधी)
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागार इमारतीत ठेवण्यात आल्या होत्या़ त्या गुरुवारी सकाळीच कडेकोट बंदोबस्तात परीक्षा केंद्रांवर पोहोच करण्यात आल्या़ त्यासाठी ६० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती़ तसेच या वाहनांवर प्रत्येकी एक सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक केंद्रांवर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़
एएमटीची सुविधा
महापालिकेच्या बस सेवा चालविणाऱ्या अभिकर्ता संस्थेने परीक्षेसाठी बससेवा उपलब्ध केली होती़ जुने बसस्थानक येथून विळदघाट, नेप्ती, चास, भिंगार, बुऱ्हाणनगर, अरणगाव, एमआयडिसी आदी महाविद्यालयांत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती़ विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रांवर पोहोचता यावे, यासाठी जुने बसस्थानक येथून बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या़ शहरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांपर्यंत गुरुवारी दिवसभर बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या़ दिवसभरात १२ हजार विद्यार्थ्यांनी बसचा लाभ घेतला़, असे शहर बस सेवेचे अभिकर्ता धनंजय गाडे यांनी सांगितले.
दीड हजार कर्मचारी, ९० वाहनांचा ताफा
परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या एकूण १ हजार ७७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येक केंद्रांवर तीन पोलिसही तैनात करण्यात आले होते़ केंद्रप्रमुखांना ६०, समन्वयकांसाठी ११, जिल्हा संपर्क अधिकाऱ्यांसाठी ९, इतर कामांसाठी १० अशी एकूण ९० वाहने परीक्षेच्या कामासाठी वापरण्यात आली़
महाविद्यालयांचे मार्केटिंग जोरात
एकाचवेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शहरात आल्याने शहरासह जिल्ह्यातील आरोग्य व विज्ञान, अभियांत्रिकी आणि मेडिकल महाविद्यालयांसाठी ही एक पर्वणी ठरली़ त्यांनी प्रवेशव्दारावर पत्रकांचे वाटप करून मार्केटिंग केले. महाविद्यालयांच्या प्रवेशव्दारावर पत्रकांचे अक्षरश: ढीग लागले होते़ अनेक विद्यार्थ्यांनी पत्रक घेतले आणि टाकून दिले़
भर उन्हात वडापाववर ताव
परीक्षा सकाळीच सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नाष्टा करण्यासाठी वेळ मिळाला नाही़ दुपारी दीड वाजता बायोलॉजीचा पेपर संपल्यानंतर रेसिडेन्शिअल, न्यू आर्टस, आणि सारडा महाविद्यालयासमोरील वडापावच्या गाडीवर अक्षरश: विद्यार्थ्यांच्या उड्या पडल्या होत्या़ अचानक गर्दी झाल्याने रस्त्यावर एकच गर्दी झाली़ वाहतुकीची कोंडी झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही गैरसोय झाली़