मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन
By शिवाजी पवार | Updated: January 29, 2024 16:52 IST2024-01-29T16:52:06+5:302024-01-29T16:52:54+5:30
मराठा आरक्षण प्रश्नी शिवजयंतीला भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन
शिवाजी पवार , अहमदनगर :मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने काढलेली अधिसूचना तसेच आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिवजयंतीला भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
दिव्यांग भवनाच्या लोकार्पणासाठी बच्चू कडू हे सोमवारी येथे आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते. जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, विधानसभा प्रमुख अप्पासाहेब ढुस, नवाज शेख, लक्ष्मण खडके, सोमनाथ गर्जे यावेळी उपस्थित होते.
बच्चू कडू म्हणाले, सध्या मंदिर मशिदीच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडले आहेत. सत्ताधाऱ्यांना केवळ धार्मिक आणि भावनेच्या मुद्द्यावर सत्ता गाजवण्यात रस आहे. शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. यापूर्वीच्या काँग्रेस तसेच आताच्या भाजप सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक फरक दिसत नाही. केवळ धार्मिक प्रश्नावर त्यांच्यामध्ये काहीसा फरक आहे. शेतकरी, कामगार व मजूरही धार्मिक मुद्द्यावर प्रभावित होत आहेत. पोटाच्या प्रश्नावर लढण्याची तीव्रता त्यांच्यामध्ये कमी झाली आहे. गरीब व श्रीमंतांमध्ये मोठी दरी पडल्याचे निराशाजनक चित्र आहे, असे बच्चू कडू म्हणाले.