वृद्ध दाम्पत्याचे धूम स्टाईलने लांबविले एक लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:39 IST2019-09-04T19:37:15+5:302019-09-04T19:39:00+5:30
गावाकडचा जुना वाडा विकून वृद्ध दाम्पत्याला मिळालेले १ लाख ५ हजार रुपये दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने हिसकावून नेले़

वृद्ध दाम्पत्याचे धूम स्टाईलने लांबविले एक लाख
अहमदनगर : गावाकडचा जुना वाडा विकून वृद्ध दाम्पत्याला मिळालेले १ लाख ५ हजार रुपये दोघा चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावून नेले़ केडगाव येथील झेंडे कॉम्प्लेक्सजवळ मंगळवारी (दि़३) सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली़
याप्रकरणी सुंदरबाई सीताराम म्हस्के (वय ७५ रा़ मुळे कॉलनी, शाहूनगर केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सुंदरबाई म्हस्के व त्यांचे कुटुंब केडगाव येथे राहते़ त्यांचा नगर तालुक्यातील दहिगाव येथे एक जुना वाडा होता़ म्हातारपणात पैशांचा आधार असावा म्हणून त्यांनी हा जुना वाडा विकला़ मंगळवारी नगर येथे शासकीय कार्यालयात विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊन त्यांना १ लाख ५ हजार रुपये मिळाले़ सुंदरबाई व त्यांचे पती सीताराम हे पैसे घेऊन रिक्षाने केडगाव येथे निघाले़ पैशाची बॅग सुंदरबाई यांच्याकडे होती़ याचवेळी पाळत ठेवलेल्या दोघा चोरट्यांनी या वृद्ध दाम्पत्याचा विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पाठलाग केला़ रिक्षा केडगाव येथील झेंडे कॉम्प्लेक्स जवळ जाताच मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका चोरट्याने बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी सुंदरबाई यांनी प्रतिकार केला मात्र चोरट्याने जोराचा झटका देऊन बॅग हिसकावून नेली़ यावेळी सुंदरबाई यांच्या हातातील बांगड्या फुटून त्यांना जखम झाली़ दरम्यान हे दोघे चोरटे घटनास्थळाजवळील दुकानांसमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत़ याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ हे करत आहेत़