गळफास घेऊन वृध्देची आत्महत्या
By Admin | Updated: October 30, 2023 18:18 IST2014-09-11T23:09:35+5:302023-10-30T18:18:47+5:30
जामखेड : भाजलेल्या विवाहितेचे बरेवाईट झाल्यास जबाबात नाव घालू असा दम दिल्याने घाबरुन वृध्देने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन वृध्देची आत्महत्या
जामखेड : भाजलेल्या विवाहितेचे बरेवाईट झाल्यास जबाबात नाव घालू असा दम दिल्याने घाबरुन वृध्देने गळफास घेऊन आत्महत्या केली. वृध्देच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन जामखेड पोलिसांनी तिघाजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील भुतवडा येथे ही घटना घडली.
शहाबाई लक्ष्मण डोके (वय ६५, रा. भुतवडा) हे आत्महत्या केलेल्या वृध्देचे नाव आहे.
याबाबत हरिभाऊ लक्ष्मण डोके रा. भुतवडा ता. जामखेड यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, माझी भावजय मीना बाबासाहेब डोके हिने मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिच्यावर सध्या नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेनंतर मीना डोके हिचा भाऊ सीताराम नवनाथ भवर, वडील नवनाथ भवर, आई संजना नवनाथ भवर (सर्व रा. देसूर, ता. आष्टी, जि. बीड) हे आमच्या घरी आले. व आमची मुलगी मीना हिचे बरेवाईट झाल्यास तुमची आई शहाबाई यांचे नाव जबाबात घालू, असा दम दिला. या दमाला घाबरुन शहाबाई हिने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे हरिभाऊ डोके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरुन जामखेड पोलिसांनी वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
(तालुका प्रतिनिधी)