प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी अटकेत
By Admin | Updated: June 12, 2014 00:11 IST2014-06-11T23:51:28+5:302014-06-12T00:11:25+5:30
परवाना नूतनीकरणासाठी लाच : २५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी अटकेत
अहमदनगर : दूध शीतकरण केंद्राचा परवाना नूतनीकरणासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा क्षेत्रीय अधिकारी प्रभू सोपानराव हाडबे (रा. औरंगाबाद) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी सावेडी येथील आकाशावाणीमागे असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातच त्याला अटक करण्यात आली.
दूध शीतकरण केंद्राचे नूतनीकरणाची फाईल नाशिक येथे पाठवायची होती. त्यासाठी हाडबे याने तक्रारदारांकडे लाच मागितली.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी कार्यालयातच सापळा लावला. पंचासमक्ष हाडबे याने २५ हजार रुपये स्वीकारले. हाडबे हा मूळचा औरंगाबाद येथे राहणारा असल्याने त्याच्या घराची झडती घेण्यासाठी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस उपअधीक्षक ए. आर. देवरे, पोलीस निरीक्षक विजय मुतडक, पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, पोलीस नाईक रवींद्र पांडे, राजेंद्र सावंत, प्रमोद जरे, श्रीपादसिंह ठाकूर, चालक पोलीस हवालदार अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)