विरोधी पक्षनेत्याला अधिकारी जुमानेना
By Admin | Updated: May 6, 2016 23:27 IST2016-05-06T23:16:07+5:302016-05-06T23:27:01+5:30
अहमदनगर : फेज टू पाणी योजनेच्या नवीन मोटारी बसविल्याने मोठा गाजावाजा करून सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचे पाणी वाढल्याचे सांगत श्रेय घेतले.

विरोधी पक्षनेत्याला अधिकारी जुमानेना
अहमदनगर : फेज टू पाणी योजनेच्या नवीन मोटारी बसविल्याने मोठा गाजावाजा करून सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचे पाणी वाढल्याचे सांगत श्रेय घेतले. शहराचे पाणी खरेच वाढले का, अशी शंका उपस्थित करत सेनेने त्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. पाहणीसाठी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिका प्रशासनाला विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी या पत्राला जुमानले नाही. त्यामुळे सेनेचा ‘मुळा धरणातील पाणी उपसा’ पाहणी दौरा अजूनही निश्चित झालेला नाही.
मुळा धरणात दोनशेऐवजी चारशे हॉर्सपॉवरच्या नव्याने दोन मोटारी बसविल्याने शहराचा पाणी पुरवठा वाढल्याचे सांगत महापालिकेतील सत्तापक्ष राष्ट्रवादीने श्रेय घेतले. मात्र, तो केवळ दिखाऊपणा होता. मोटारी नव्याने बसविल्या तरी त्या सुरू झालेल्या नाहीत. पाईपलाईन तीच असल्याने पाणी कसे काय वाढेल? असे प्रश्न उपस्थित करून सेनेच्या नगरसेवकांनी सत्तापक्षाचे श्रेय घेण्याची पोलखोल करण्याचे ठरविले. त्यानुसार सेनेचे सर्व नगरसेवक ‘मुळा धरणातील पाणी उपसा केंद्राला’ भेट देण्यासाठी जाण्याचे निश्चित झाले. तांत्रिक माहितीसाठी अधिकाऱ्यांना सोबत घेण्याचा निर्णय झाला. अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी सेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी प्रशासनाला तसे पत्र दिले. मात्र, अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. अधिकारी नसल्याने दोन वेळेस हा पाहणी दौरा रद्द करावा लागला. विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्राला प्रशासनाने जुमानले नाही, हेच यावरून स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षाची कणखर भूमिका नाही
महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कणखर नसल्यानेच प्रशासन त्यांना जुमानत नसल्याचे दिसते. किंबहुना सत्तापक्षाच्या दबावामुळे अधिकारी आले नसावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे. संजय शेंडगे यांनी महासभेत म्हणाले, अन्य प्रश्नावर सत्तापक्षाला कोंडीत पकडून नाकी दम आणला, असे कधी झाल्याचे दिसले नाही. विरोध म्हणून फक्त पत्र देण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा प्रशासनावर जो दबदबा असायला हवा, तो निर्माण झाला नाही. त्यामुळेच विरोधी पक्ष नेत्याच्या पत्राला प्रशासनाने जुमानले नसावे, अशी चर्चा आहे.
प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र, त्यात तारीख लिहिलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याने अधिकारी तिकडे गेले होते. नंतर सेना नगरसेवकांच्या जमवाजमवीला उशीर झाला. त्यामुळे पाहणी दौऱ्यास विलंब झाला आहे.
- संजय शेंडगे.