ओ शेठ..., कधी जगायचे आम्ही थेट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:46+5:302021-07-30T04:21:46+5:30
राहाता : ‘इथे मागायची मुश्किल झाली.., जगायची अडचण केली.., आमची मागणीच आहे थेट.., ओ शेठ.. कधी ...

ओ शेठ..., कधी जगायचे आम्ही थेट ?
राहाता : ‘इथे मागायची मुश्किल झाली.., जगायची अडचण केली.., आमची मागणीच आहे थेट.., ओ शेठ.. कधी जगायचं आम्ही थेट...’ या प्रकारची हाक आता नागरिक घालत आहेत. या हाकेच्या माध्यमातून लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
कोरोना महामारीत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पहिल्या लाटेत देशभरात ९ महिन्याचे कडक लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले. त्यानंतर काही महिन्यात जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा दुसरी लाट आली. यात अनेकांचे बळी गेल्याने पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन स्वीकारावा लागला. यामुळे सर्वसामान्य जनतेसह शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक, कला या क्षेत्राची घडी सुरू होण्याअगोदरच कोलमडून पडली.
त्यानंतरही तिसऱ्या लाटेच्या भीतीने अनलॉक थ्री चे निर्बंध लागू आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत व्यवहार सुरु करण्यास परवाना देत बाजारपेठेवर नित्रंत्रण ठेवण्यात आले. पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश लागू करण्यात आले. या वेळेत पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरु होत नसल्याने सर्वांनाच मोठ्या प्रमाणात अर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी, खेळाडू, कलाकार अस्वस्थ आहेत. सायंकाळी ४ नंतर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने सर्वांचे जगणे सुरळीत होण्याकरिता किमान नियमांचे पालन करुन सरसकट मोकळीक द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे.
.......................
मी हॉटेलचा कामगार आहे. पूर्वी मला सकाळी १० ते रात्री १० पर्यंतच्या कामाचे चारशे रुपये रोजंदारी मिळायची. आता दुपारी चार वाजेपर्यंत दोनशे रुपये मिळतात. यामुळे घर खर्चाचा ताळमेळ बसत नाही. यामुळे घरात आर्थिक कटकटीचा सामना करावा लागतो.
- रहीम शेख, अस्तगाव
...................
कार्यक्रमावर बंदी घातल्याने दोन वर्षात एकही जागरण गोंधळाचा कार्यक्रम न मिळाल्याने माझ्या सहकाऱ्यांची उपासमार सुरु आहे. पण, करणार काय ? दुसरे काम करता येत नाही.
- वाघ्या, सोनेवाडी
..................
मी शहरी भागात राहतो. मी दहावीला आहे. पण, माझ्याकडे मोबाईल नाही. शहरी भागात शाळा सुरु होत नाही. मी कसा अभ्यास करायचा. मला कळत नाही. अभ्यासाचे खूप दडपण आहे.
- साहिल शिरसाठ, विद्यार्थी, राहाता