अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. पहिल्या क्रमांकावर असणारे अहमदनगर शहर थेट नवव्या क्रमांकावर गेले असल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. नगरमध्ये केवळ १९५ इतके रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी ३,९३६ इतक्या सर्वाधिक रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८७ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८६.४० टक्के आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३,१८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७ हजार ८६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०९४ आणि अँटिजन चाचणीत ७४२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (३६१), अकोले (२७६), पाथर्डी (२६९), पारनेर (२४६), नगर ग्रामीण (२३९), कर्जत (२२५), नेवासा (२०९), राहुरी (१९६), नगर शहर (१९५), श्रीरामपूर (१८३), शेवगाव (१६९), राहाता (१५५), कोपरगाव (१३५), जामखेड (१२९), श्रीगोंदा (११२), इतर जिल्हा (४९), भिंगार (३४), मिलिटरी हॉस्पिटल (१), इतर राज्य (१). दरम्यान २४ तासात २७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.
-------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या :१,८७,१०७
उपचार सुरू असलेले रुग्ण : २७,०८६
मृत्यू : २,३६५
एकूण रुग्णसंख्या : २,१६,५५८
----