आता रिकामटेकड्यांना ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:45+5:302021-04-19T04:18:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना आता थेट पोलीस ठाण्यात नेवून त्यांना कोरोनासंदर्भात लेक्चर ...

आता रिकामटेकड्यांना ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना आता थेट पोलीस ठाण्यात नेवून त्यांना कोरोनासंदर्भात लेक्चर देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. वाहन जप्ती, दंड व गुन्हा दाखल करणे अशा स्वरूपाची कारवाईही आणखी कडक केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी फौजफाट्यासह नगर शहरासह भिंगार परिसरात गस्त घातली. यावेळी बाहेर फिरणारे नागरिक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली. यावेळी पोलीस वाहनातून लाऊड स्पीकरने नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. नगर शहरासह जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे. नागरिक नियमांचे पालन करत असले तरी काहीजण मात्र नियम तोडून विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. विनाकारण फिरताना आढळलेल्यांचे वाहन जप्त केले जाणार आहे. त्यांच्याकडे कागदपत्र असतील तरच ते वाहन मुक्त केले जाईल तसेच दंडात्मक कारवाई करून गुन्हाही दाखल केला जाणार आहे. त्याचबरोबर कोरोना किती घातक आहे, याची समज मिळावी म्हणून बाहेर फिरणाऱ्या लोकांना पोलीस ठाण्यात नेवून कोरोना संदर्भात लेक्चर दिले जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
...............
भाजीपाला खरेदीसाठी गर्दी
शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एकविरा चौक येथे रविवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी विक्रेत्यांसह ग्राहकांनीही सोशल डिस्टन्सचा नियम पाळला नाही. दुपारी पोलिसांची गस्त सुरू होताच रस्ते निर्मनुष्य झाले.
...............
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करणार नाहीत, मात्र जे विनाकारण फिरताना आढळतील, त्यांना पोलीस ठाण्यात नेवून कोरोना संदर्भात लेक्चर दिले जाईल तसेच इतर कारवाईही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करत घरीच थांबावे.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
.........
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. नगर शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच अत्यावश्यक कामासाठीच शहरात यावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
फोटो ओळी - नगर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी समज दिली.