आता ‘होम आयसोलेशन’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:58+5:302021-04-01T04:21:58+5:30
अहमदनगर : वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ...

आता ‘होम आयसोलेशन’ बंद
अहमदनगर : वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांसाठी आता ‘होम आयसोलेशन’ बंद करण्यात येणार आहे. यापुढे रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच (सीसीसी) ठेवले जाईल. त्यासाठी प्रत्येक तालुक्यांनी, तसेच महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही भोसले यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बुधवारी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तालुकास्तरीय सर्व यंत्रणांनी, तसेच अगदी गावपातळीवरही संपर्कातील व्यक्ती शोधण्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियुक्त पथकांनी कडक अंमलबजावणी करावी. संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे असून, त्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, तसेच प्रत्यक्ष लोकसहभाग महत्त्वाचा आहे. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे असणाऱ्या अथवा त्रास जाणवणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घेतली पाहिजे, याकडे यंत्रणेने लक्ष ठेवावे.
उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरची उभारणी, तेथील व्यवस्था, औषधांची उपलब्धता याबाबत दक्षता घ्यावी. सीसीसी आणि डीसीएचसीमधील व्यवस्थेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि त्याची नोंद दैनंदिन स्वरूपात पोर्टलवर करण्यात यावी. नागरी भागात एकाच परिसरात पाचपेक्षा अधिक, तर ग्रामीण भागात एकाच परिसरात पंधरापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले, तर तेथे कंटेन्मेंट झोन करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी. कंटेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांच्या चाचण्या केल्या जाव्यात. पथकामार्फत तेथे सर्वेक्षण केले जावे. त्या क्षेत्रात नागरिकांची ये-जा प्रतिबंधित करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.