आता हेल्मेट कम्पलसरी
By Admin | Updated: June 23, 2014 00:06 IST2014-06-22T23:22:23+5:302014-06-23T00:06:46+5:30
अहमदनगर : महामार्गावर सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. यामध्ये डोक्याला मार लागल्यानेच अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
आता हेल्मेट कम्पलसरी
अहमदनगर : महामार्गावर सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. यामध्ये डोक्याला मार लागल्यानेच अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले आहे. या दुचाकीस्वारांना हेल्मेट असते तर ते वाचण्याची शक्यता अधिक होती. मात्र हेल्मेट नसल्याने त्यांचे प्राण वाचले नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हा विशेष वाहतूक शाखेने महामार्गावर दुचाकी चालविणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याची लवकरच अंमलजबावणी केली जाणार असून हेल्मेट न वापरणाऱ्यांना जास्तीत जास्त दंड आकारण्यात येणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट सक्ती ही संपूर्ण देशभर आहे. पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत आहे. देशभर हा कायदा लागू असताना अहमदनगर जिल्हा यामध्ये अपवाद नाही. म्हणूनच जिल्ह्यातही दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याबाबत नियोजन करीत असल्याची माहिती जिल्हा विशेष वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा विशेष वाहतूक शाखा स्थापन केली. श्रीरामपूर येथे धडाकेबाज कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्यावर या शाखेची जबाबदारी देण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या कामात ते व्यस्त होते.
संपूर्ण जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावणे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आदी कामे या विशेष शाखेकडे आहेत. सपकाळे यांच्यावर जबाबदारी दिली असली तरी या शाखेसाठी अद्याप कोणतेही साधने, पोलीस कर्मचारी दिलेले नाहीत. सपकाळे सध्या जिल्हा विशेष शाखेतच बसून कार्यभार पाहतात. त्यांच्या शाखेत अद्याप एकाही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे जिल्हा विशेष शाखा नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान लोकसभा आचारसंहिता आणि पोलीस भरती या व्यस्त कार्यक्रमांमुळे या शाखेचा विस्तार अद्याप झाला नाही. याबाबत पोलीस अधीक्षक शिंदे यांच्याशी चर्चा करून शाखा कार्यान्वीत करण्याचे प्रयत्न असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
दुचाकी चालकांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्यालाच गंभीर इजा झाल्याचे लक्षात येत आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अनेक कुटुंब निराधार झाली आहेत. ज्याला कुटुंबाची काळजी आहे, त्यांनी हेल्मेट वापरले पाहिजे,याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू झाल्यानंतर हेल्मेट न वापरल्यास दंडात्मक कारवाई होईल.महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई केली जाईल.
-प्रकाश सपकाळे,
पोलीस निरीक्षक
हेल्मेट न वापरणाऱ्यांना शंभर रुपये दंड
मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांना शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जिल्हा विशेष शाखेला २० ते २५ जणांची टीम उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हाभर महामार्गावर हेल्मेटची तपासणी केली जाणार आहे.
मोटार वाहन कायदा देशभर एकच असल्याने नगर जिल्ह्यातही हेल्मेट सक्ती लागू आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही. लोकांचे प्राण वाचविणे हाच या हेल्मेट वापरण्यामागील उद्देश असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.