कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:20+5:302021-04-18T04:20:20+5:30
राहुल नेवाशा भोसले (वय २२, रा. वाळकी, ता. नगर), दगू बडोद भोसले (वय २७, रा. पढेगाव, ता. कोपरगाव) व ...

कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद
राहुल नेवाशा भोसले (वय २२, रा. वाळकी, ता. नगर), दगू बडोद भोसले (वय २७, रा. पढेगाव, ता. कोपरगाव) व उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय ३३, रा.वाळकी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी अकलूज (जि. सोलापूर) येथील हर्षल शिवशंकर चौधरी यांना स्वस्तात गोडतेल देण्याचे आमिष दाखवून १४ एप्रिल रोजी नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारात बोलावून घेतले होते. या ठिकाणी चौधरी यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडील ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून या तिघा आरोपींना अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक जारवाल स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक मिथुन घुगे, इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्तत्रय हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, संदीप पवार, कॉन्स्टेबल रवीकिरण सोनटक्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
......
आरोपी दगू भोसले तीन वर्षांपासून होता फरार
आरोपी दगू भोसले याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तो फरार होता. आरोपी राहुल भोसले व उरूस चव्हाण यांच्या विरोधातही कोपरगाव, संगमनेर, नगर तालुका व निफाड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.