काष्टी सोसायटीच्या संचालक मंडळ, व्यवस्थापकांना निबंधकांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:43+5:302021-07-20T04:16:43+5:30
काष्टी : राज्यात अग्रेसर असलेल्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक, बॕँक ...

काष्टी सोसायटीच्या संचालक मंडळ, व्यवस्थापकांना निबंधकांची नोटीस
काष्टी : राज्यात अग्रेसर असलेल्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक, बॕँक अधिकाऱ्यांना कलम ८३ च्या चौकशीनंतर कलम १४६ प्रमाणे कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस श्रीगोंद्याचे सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी बजावली आहे, अशी माहिती नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राकेश कैलास पाचपुते, प्रा. सुनील माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सहकारमहर्षी काष्टी सहकारी सोसायटीत मागील पाच वर्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्ज वाटप केले. यामध्ये संस्थेच्या १२८ सभासदांना २ कोटी २१ लाख ७८ हजार ५०० रुपये इतक्या रकमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप केलेले चौकशीत उघड झाले आहे. यामध्ये संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण झाले आहे. अगदी दैनंदिन कामकाजावर ज्याचे बारकाईने लक्ष असते ते भगवानराव यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, पुतण्या, भावजयी यांनाही नियमबाह्य कर्ज दिल्याचे धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. १२८ पैकी ९५ सभासदांच्या नावाने कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले. त्यामध्ये ज्या सभासदांना नियमबाह्य कर्जे दिली. त्यांना कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
चौकशी अहवालामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यांवर संस्था संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक हे दोषी असल्याचे सहकार खात्याकडून सूचित करण्यात येऊन १९९६ पासून २०२० पर्यंत २४ वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पाहणारा एस. बी. बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी गैरकारभाराबद्दल निलंबित करून चौकशी अधिकारी म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
राकेश पाचपुते व सुनील माने यांनी सहकार खात्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन कलम ८३ नुसार चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल सादर केला आहे. यामुळे संस्थेचा गैरकारभार समोर आला आहे. कलम १४६ प्रमाणे दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहकार खात्याने सुरू केली असल्याची माहिती पाचपुते व माने यांनी दिली. यावेळी काष्टी सोसायटीचे माजी अध्यक्ष कैलासराव पाचपुते, ॲड. विठ्ठलराव काकडे, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, दत्तात्रय गेणबा पाचपुते, मधुकर क्षीरसागर, आरपीआयचे बंडू जगताप, काशिनाथ काळे आदी उपस्थित होते.