धोकादायक इमारतींना नोटिसा; नालेसफाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:37+5:302021-06-02T04:17:37+5:30
शेवगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगर परिषदेने शहरातील धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. नगरपरिषदेच्या ...

धोकादायक इमारतींना नोटिसा; नालेसफाई सुरू
शेवगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगर परिषदेने शहरातील धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर शहरात जवळपास २० धोकादायक इमारती आणि वाडे असून, या सर्वांना पालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तसेच शहरातील ओढे, नालेसफाईला सुरुवात केली आहे.
‘लोकमत’ने २७ मे रोजीच्या अंकात ''पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनाकडे शेवगाव नगरपरिषदेचे दुर्लक्ष'' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शहरातील माळी गल्ली, गवळी गल्ली, भारदे गल्ली, देशपांडे गल्ली, भाडाईत गल्ली, मेनरोड, इंदिरानगर, खालचीवेश आदी गल्लीतील धोकादायक इमारती, वाड्यांसह पोलीस ठाण्यासमोरील खरेदी-विक्री संघाच्या इमारतीला मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तत्काळ शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून परिषदने नोटिसा बजावल्या असल्या तरी यातील बहुसंख्य वाडे आणि इमारतींमध्ये भाडेकरू आणि घरमालकांचा वाद असल्याने नोटिसांचा परिणाम होत नसल्याने अनेक जिवांना धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून पावसाळ्यात दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ न देण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर शहरातील गटारी, नाले, ओढे सफाईला सुरुवात झाली असून नालेसफाईचे काम येत्या पाच दिवसांत पूर्ण होईल, असे प्रभारी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.
.............
नगर परिषदेला कोण नोटीस बजावणार
शहरातील धोकादायक वाडे, इमारतींना नगर परिषदेने पुन्हा एकदा नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मात्र, नगर परिषदेची इमारत धोकादायक अवस्थेत उभी असून इमारतीला अनेक ठिकाणी तडे जाऊन पडझड झाली आहे. अशा परिस्थितीतही या इमारतीत विविध विभागाचे प्रशासकीय कामकाज सुरू आहे. याचबरोबर कार्यालयाच्या खालच्या बाजूचे गाळे व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत काळात १९६८ साली बांधण्यात आलेली इमारत धोकादायक अवस्थेत उभी असून या नगरपरिषदेला कोण नोटीस बजावणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
010621\img-20210601-wa0030.jpg
शेवगाव नगर परिषदने शहरातील विविध प्रभागात गटारी नाले सफाईला यंत्राच्या साहाय्याने सुरवात केली आहे.