गाईच्या कासेला बर्फ न लावल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:40+5:302021-04-02T04:20:40+5:30
संगमनेर (जि. अहमदनगर) : गाईच्या कासेला आलेल्या सुजेवर बर्फ न लावल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ...

गाईच्या कासेला बर्फ न लावल्याने
संगमनेर (जि. अहमदनगर) : गाईच्या कासेला आलेल्या सुजेवर बर्फ न लावल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ३० मार्च) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील बोडखेवाडी येथे घडली. या प्रकरणी बुधवारी (दि. ३१) रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती शिवाजी दिघे (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
शिवाजी रामनाथ दिघे (वय ३३) असे पतीचे नाव असून, त्याच्याविरोधात महेश जिजाबा वाणी (रा. नान्नज दुमाला, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील बोडखेवाडी येथे शिवाजी दिघे व भारती दिघे हे पती-पत्नी राहत होते. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोघेही गोठ्यात गेले होते. गाईच्या कासेला सूज आल्याने गाय दूध देत नसल्याने कासेला बर्फ लावणे गरजेचे होते. त्या कारणावरून पती-पत्नीत भांडण झाले. शिवाजी दिघे याचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नी भारती यांच्या डोक्यात दगड घातला. यात भारती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक टी. आर. पवार हे घटनास्थळी दाखल झाले. पती शिवाजी दिघे याला पोलिसांनी अटक केली आहे.