सहकार कर्मचाऱ्यांचे १० पासून असहकार आंदोलन
By Admin | Updated: July 8, 2014 00:30 IST2014-07-07T23:26:24+5:302014-07-08T00:30:02+5:30
अहमदनगर : प्रशासन विभागात पदांची निर्मिती करून त्यानुसार लेखापरीक्षण विभागात अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय सहकार विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे.

सहकार कर्मचाऱ्यांचे १० पासून असहकार आंदोलन
अहमदनगर : प्रशासन विभागात पदांची निर्मिती करून त्यानुसार लेखापरीक्षण विभागात अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय सहकार विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि सेवाज्येष्ठतेवर विपरित परिणाम होणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभरातील सहकार विभागातील कर्मचाऱ्यांनी १० जुलैपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकार खात्यात प्रशासन विभाग व लेखापरीक्षण असे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. दोन्ही विभागाचे कामकाज, नियुक्ती प्रक्रिया आणि सेवानियम वेगवेगळे आहेत. सहकारी संस्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांची आवश्यकता असतांना लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा सहकार विभागातील कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आला आहे. सहकार खात्याचे सचिव यांनी १४ जूनला नियोजित आकृतीबंध व पदनिर्मिती संदर्भात कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली होती. यावेळी प्रस्तावित आकृतीबंधाचे सादरीकरण केले होते. त्यावेळी या निर्णयाची प्रत अभ्यासासाठी संघटनेला मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, सहकारी खात्याने त्या संबंधीची प्रत दिली नव्हती. याचा कर्मचारी संघटनेकडून २ जुलै रोजी झालेल्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला होता. आता कर्मचाऱ्यांच्यावतीने या प्रस्तावित समायोजनाला विरोध करण्यासाठी १० जुलैपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसिध्दीपत्रकावर बी.बी. सिनारे, अलताप शेख, व्ही.के. मुरकुटे, राजेश चाबुकस्वार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.