दीडशे जागांसाठी नऊ हजार अर्ज
By Admin | Updated: June 6, 2014 01:02 IST2014-06-06T00:04:11+5:302014-06-06T01:02:00+5:30
अहमदनगर : पोलीस दलातील शिपाई पदासाठी शुक्रवार (दि.६) पासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ती पार पडणार आहे.

दीडशे जागांसाठी नऊ हजार अर्ज
अहमदनगर : पोलीस दलातील शिपाई पदासाठी शुक्रवार (दि.६) पासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ती पार पडणार आहे. १५९ जागांसाठी तब्बल नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेले उमेदवार गुरुवारीच नगरमध्ये दाखल झाले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार असून भरती प्रक्रियेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी दिली.
भरती प्रक्रियेसाठी पोलीस मुख्यालयाचे मैदान सज्ज झाले आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात चाचणी घेण्यात येईल. सकाळी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना चेस्ट क्रमांक दिले जाणार आहेत. हे क्रमांक घेऊन त्यांना पुढील चाचण्यांसाठी पाठविण्यात येईल. पोलीस अधिकार्यांचे भरती मंडळ तयार करण्यात आले आहे. हे मंडळ उमेदवारांची चाचणी परीक्षा घेईल. भरती प्रक्रियेसाठी निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शारीरिक क्षमता चाचणीसाठी किमान सहा दिवस लागणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या चाचणी परीक्षांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक शिंदे गेल्या दोन दिवसांपासून नियोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)
पावसाने होणार हाल
गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पोलीस भरतीसाठी येणारे उमेदवार सिद्धीबाग, न्यू आर्टस् महाविद्यालय, रेसिडेन्सिअल कॉलेज परिसरात मुक्काम करतात. यंदा मात्र पाऊस सुरू झाल्याने तसेच आणखी चांगल्या पावसाची शक्यता असल्याने उमेद्वारांची धावपळ होण्याची शक्यता आहे. दोन्ही महाविद्यालयाच्या व्हरांड्यात उमेदवारांचा मुक्काम असला तरी पावसामुळे उमेदवारांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस आला तर मैदानी चाचण्यांमध्येही अडथळे येण्याची शक्यता आहे. उन्हामुळे सकाळी आणि सायंकाळच्यावेळीच भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.