नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
By चंद्रकांत शेळके | Updated: October 16, 2023 17:17 IST2023-10-16T16:55:53+5:302023-10-16T17:17:57+5:30
नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते.

नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
अहमदनगर : नगर-आष्टी रेल्वेगाडीच्या नऊ डब्यांना अचानक आग लागल्याने हे डबे जळून खाक झाले. सोमवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास नगरजवळील वाळुंज शिवारात ही घटना घडली. ही रेल्वे आष्टीकडून नगरकडे येत होती.
नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते. प्रवाशी घेऊन सकाळी ११ वाजता ती पुन्हा आष्टीतून नगरकडे फिरते. सोमवारी ही गाडी आष्टीहून निघाल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर-सोलापूर रोडवर वाळुंज शिवारात आली असता गाडीच्या पुढील बाजूने एका डब्याला आग लागली. चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गाडी थांबवली. तोपर्यंत पेटलेल्या डब्यातून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. या गाडीला प्रतिसाद नसल्याने एकही प्रवाशी गाडीत नव्हता. दरम्यान, एकापाठोपाठ एक डब्यांना आग लागण्यास सुरूवात झाली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाला ही माहिती समजताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने अग्नीशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या. परंतु पेटलेले डबे शेतात असल्याने तेथे जाण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान, दोन तासांहून अधिक काळ झाल्याने नऊ डब्यांना आग लागली. उशिरापर्यंत आग शमविण्याचे काम सुरू होते. शाॅर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते.