निळवंडे धरण भरले; प्रवरा नदीपात्रात ३३६० क्युसेकने पाणी झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 15:11 IST2021-09-13T15:08:42+5:302021-09-13T15:11:52+5:30
भंडारदरा धरण रविवारी ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी प्रवरा नदीपात्रातून निळवंडे धरणात पोहोचल्यानंतर निळवंडेचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला.

निळवंडे धरण भरले; प्रवरा नदीपात्रात ३३६० क्युसेकने पाणी झेपावले
राजूर : भंडारदरा धरण रविवारी ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी प्रवरा नदीपात्रातून निळवंडे धरणात पोहोचल्यानंतर निळवंडेचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी निळवंडे धरणातून एकूण ३ हजार ३६० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आणि प्रवरा नदी वाहती झाली.
भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्याने रविवारी सकाळी अकरा वाजता भंडारदरा धरण काठोकाठ भरले आणि या धरणातून ४ हजार ४०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या पाण्याबरोबरच कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंतीचे पाणी आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी असे सर्व पाणी निळवंडे धरणात येत आहे. या पाण्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या धरणातील पाणी साठा ९४ टक्के झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. प्रवरा पात्रात ३ हजार ३६० क्युसेकने पाणी पडू लागले. सोमवारी सकाळी या हंगामातील सुरवातीलाच येथील वीजनिर्मिती सुरू झाली. वीज निर्मितीसाठी धरणातून ६८५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.