नीलेश लंके यांच्या कामाची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:38+5:302021-06-04T04:17:38+5:30
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविड सेंटरला राज्याचे मंत्री, विविध जिल्ह्यांमधील आमदारांनी भेटी दिल्या आहेत. १४ एप्रिल रोजी सुरू ...

नीलेश लंके यांच्या कामाची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून दखल
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविड सेंटरला राज्याचे मंत्री, विविध जिल्ह्यांमधील आमदारांनी भेटी दिल्या आहेत. १४ एप्रिल रोजी सुरू झालेल्या या कोविड सेंटरमधून आतापर्यंत साडेेसात हजार रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. त्यांच्या या कामाची माध्यम विश्वाने दखल घेत त्यांचे काम सातासमुद्रापार पोहोचविले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत नीलेश लंके यांच्यासारखा आमदार असावा, अशीच अपेक्षा जनमानसातून व्यक्त झाली. प्रत्येक जिल्ह्यात नीलेश लंके यांच्यासारखे काम इतर आमदार का करू शकत नाहीत, असे प्रश्नही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना विचारले गेले. नीलेश लंके यांच्या कामाची दखल घेत असताना राज्यातील इतर आमदारांचा लेखाजोखाही मांडला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते मंत्री, आमदार, खासदारांनी आमदार लंके यांच्या कामाची दखल घेऊन कौतुक केले. यातील अनेक आमदारांनी कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेटही दिली. राज्यात कुठेही गेले तरी नीलेश लंके यांचे विविध पद्धतीने स्वागत झाले. राज्याबाहेरही उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी थेट आ. नीलेश लंके यांच्याशी संपर्क करून कोविड सेंटरचे काम जाणून घेतले आहे.
दरम्यान, आमदार लंके यांच्या रुग्ण सेवेचे सोशल मीडियातून मोठे गुणगान होत आहे. शिरुर येथील टिकटॉक स्टार विद्याताई घोडे यांनीही आमदार लंके यांच्यावर गीत तयार केले आहे. आ. लंके यांनी घोडे यांच्या घरी भेट देऊन विद्याताई घोडे यांचा सन्मान केला आहे.
----
अजित पवारांना विचारला प्रश्न
सातारा येथे कोरोना आढावा बैठकीमध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात एखादा आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे काम का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असल्याचे सांगत यावेळी अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील आमदारांची बाजू सावरून नेली. सातारा जिल्ह्यातही आ. लंके यांच्याप्रमाणेच झोकून काम करणाऱ्या आमदाराची आवश्यकता असल्याचे मत या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. याच जिल्ह्यातील एका कोविड सेंटरला आमदार लंके यांचे नाव दिले जाणार आहे.