जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:07 IST2018-08-01T17:06:15+5:302018-08-01T17:07:16+5:30
जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा बुधवारी झाली.

जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण
जामखेड : जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा बुधवारी झाली. त्यापाठोपाठ उपनगराध्यक्षपदी फरिदा असिफखान पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी तब्बल १३ जण इच्छुक होते. त्यामुळे यासाठी मोठी चुरस होती. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने दोन्ही निवडी बिनविरोध करीत नगरपालिकेवर आपली पकड घट्ट केली.
निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडीसाठी दुपारी २ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. २७ जुलैस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. मुदतीत घायतडक यांचेच दोन अर्ज दाखल होऊन मंजूर झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा तेवढी शिल्लक होती. विशेष सभा सुरू होताच निवडणूक अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदासाठी घायतडक यांचेच उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
पालकमंत्री राम शिंदे यांनी आदेश दिल्याप्रमाणे फरिदा असिफखान पठाण यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नाराज झालेल्या वैशाली ज्ञानेश्वर झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी विरोधी गटाकडून कमल महादेव राळेभात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे वातावरण तापले होते. परंतु दोन तासाच्या कालावधीत चर्चा, बैठका झाल्या. दोन वाजता नगराध्यक्षपदांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल तीन उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकाºयांनी छाननी करून वैशाली झेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दोन वेगवेगळ्या सह्या असल्याने तो उमेदवारी अर्ज नामंजूर केला. पठाण व राळेभात यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले. राळेभात यांनी माघार घेतल्यामुळे उपनगराध्यक्षपदी पठाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून फटाक्यांची आतीषबाजी केली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री राम शिंदे व नगरसेवकांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवड केल्याबद्दल नगराध्यक्ष घायतडक यांनी पालकमंत्री व नगरसेवकांचे आभार मानले. मावळत्या नगराध्यक्ष अर्चना राळेभात, मावळते उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, सर्व नगरसेवक, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, प्रविण सानप, भाजपचे कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते.